मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेवाशात आश्वासन
शेतकऱ्यांना पीक विम्याचे ९९ कोटी, दूध अनुदानाचे १० कोटी दिले
नेवासा/कन्नड : महायुती सरकारने अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेत ९९ कोटी ३३ लाख रुपयांची भरपाई दिली. कापूस सोयाबीनसाठी १९ कोटी, दूध अनुदानासाठी १० कोटी दिले. हे सरकार घेणारे नाही तर जनतेला देणारे सरकार आहे. पुन्हा सत्तेत आल्यावर ज्ञानेश्वर सृष्टीचा ८५० कोटींचा विकास आराखडा तातडीने मंजूर केला जाईल. अहमदनगरचे नाव अहिल्यादेवी नगर केले आता त्याचाही विकास आराखडा मंजूर करु, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. नेवासा येथे महायुतीचे उमेदवार विठ्ठल लंघे पाटील यांच्यासाठी घेतलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.
इथे जमलेला प्रचंड जनसुमदाय पाहता भगव्याचा विजय निश्चित आहे. नेवाशाची जनता पुंडलिकाप्रमाणे असून ती विठ्ठलाच्या विजयाची वीट ठेवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. नेवाशातील वारं फिरलंय, मतदार संघाचा विकास करण्यासाठी परिवर्तनाशिवाय पर्याय नाही, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
तत्पूर्वी संभाजीनगरमधील कन्नड येथे महायुतीच्या उमेदवार रंजना जाधव यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली. ते म्हणाले की बाळासाहेबांचे स्वप्न होते औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर करण्याचे धाडस महायुती सरकारने दाखवले. रयतेचे राज्य जसे शिवरायांनी दाखवले त्याच मार्गावर आपले सरकार काम करत आहे. राज्यातील कॉमन मॅनला सुपरमॅन बनवायचे आहे. छत्रपती संभाजी नगरातून १ लाख ६ हजार लाडक्या बहिणींनी अर्ज भरले आहेत. त्यासोबत १ लाख भावोजींचे मते मिळाली तर विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. राज्यात महाविकास आघाडीचे हप्ते घेणारे सरकार होते. मात्र आपले सरकार हे गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, ज्येष्ठ नागरिकांचे शेतकऱ्यांचे, माता भगिनींचे आणि युवकांचे आहे, असे ते म्हणाले. दोन वर्षात सरकारने विकासकामे आणि कल्याणकारी योजना राबवल्या. कन्नडमध्ये मागील १५ वर्षांत आमदाराने काय काम केलं जनतेला काय दिलं असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत जनतेने शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचे हे दाखवून दिले. राज्यातील लाडक्या बहिणींना १५०० आणि २१०० रुपयांवर मर्यादित नाही ठेवणार तर त्यांना लखपती करायचे आहे, असा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. लाडक्या भावांच्या हाताला रोजगार द्यायचा आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून मराठा तरुणांना बिनव्याजी १५ लाखांचे कर्ज दिले जाते त्याचा तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांना वर्षाला १५ हजार रुपये, ७,५ एचपी मोटरपंपाचे बील माफ केले, वृद्धांना पेन्शन देणार, १० लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण भत्ता, ४५ हजार गावात पांदण रस्ते, अंगणवाडी आणि आशा सेविकांना १५००० रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला. ही आश्वासने पूर्ण करण्यासाठी सरकारने नियोजन केले आहे.
विरोधकांनी लाडकी बहिण योजनेवर टीका करताना पैसे कुठून आणणार प्रश्न विचारत होते. मात्र आम्ही आश्वासने पूर्ण करणारे आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. काही लोक समाजात फूट पाडत आहे. काही लोकांनी मराठा समाजाला आणि ओबीसी समाजाला सांगितले अमुकांना मतदान करा, मात्र अशा लोकांपासून सावध रहा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. शिवसेनेशी ज्यांनी बेईमानी केली ते आज घरी बसले आहेत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी उबाठाला लगावला.