मुंबई – नुकतेच शिंदे गटाच्या नेत्यांना महामंडळ वाटप करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात असलेल्या महामंडळांचे वाटप लवकरात लवकर करावे यासाठी अजित पवार आग्रही आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागा वाटपासंदर्भात बैठकांवर बैठका सुरू आहेत. महायुतीने आपल्या जागा वाटपाबाबतची चर्चा पूर्ण करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतच मुदत निश्चित केली आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही जागावाटपांचा तिढा कायम आहे. सप्टेंबर अखेर जागावाटपाची चर्चा पूर्ण केली जाणार असून ज्या जागावर तिढा आहे, त्याचा तोडगा केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासमक्ष निघणार असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत अजित पवार आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत दोन स्वतंत्र बैठका झाल्या आहेत. या बैठकीत ज्या समान जागांवर आग्रह आहे, अशा जागांबाबत चर्चा झाली. मात्र, ज्या जागांवर तीनही पक्ष आग्रही आहेत. अशा जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीवेळीही जागावाटपाचा तिढा अमित शाहांनी सोडवला होता. त्याचप्रमाणे आताही तसेच होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.