१ लाख ७५ हजार आयुष्मान आरोग्य मंदिर निर्माणाचे उद्दिष्ट – जे.पी. नड्डा

0

पुणे : सन २०१७ पूर्वी भारतातील आरोग्यसेवा धोरणे उपचारात्मक होती परंतु आता आयुष्मान आरोग्य मंदिर अंतर्गत आम्ही प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक,उपचारात्मक,पुनर्वसनात्मक आणि उपशामक काळजी अशा सेवांची व्यापक श्रेणी प्रदान करण्यासाठी निवडक दृष्टिकोनातून आरोग्य सेवे कडे पाहात आहोत. आरोग्यसेवेकडे पाहण्याचा एक समग्र दृष्टिकोन आता विकसित झाला आहे, असे जगत प्रकाश नड्डा, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री,भारत सरकार यांनी सांगितले.

जे. पी. नड्डा यांच्या हस्ते शनिवार २६ एप्रिल रोजी सिंबायोसिस रुग्णालय व संशोधन केंद्र,लवळे,पुणे येथे नेफ्रोलॉजी व युरोलॉजी सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. शां. ब. मुजुमदार,संस्थापक व अध्यक्ष,सिंबायोसिस व कुलपती सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. डॉ. राजीव येरवडेकर,प्रोव्होस्ट,वैद्यकीय व आरोग्य विज्ञान विद्याशाखा,सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ व डॉ. विद्या येरवडेकर,प्रधान संचालिका,सिंबायोसिस व प्र कुलपती,सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आदी इतर मान्यवर या समारंभासाठी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना नड्डा म्हणाले, राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानकांनुसार (एनडब्ल्यूएएस) सध्या ३० हजार आयुष्मान आरोग्य मंदिर आहेत आणि आमचे लक्ष्य हे लवकरच १ लाख ७५ हजार आयुष्मान आरोग्य मंदिरे निर्माण करण्याचे आहे जेणेकरून सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रदान करता येईल, जी लोकांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करेल व या अंतर्गत विस्तारित आरोग्य सेवा देण्यात येईल. सिंबायोसिस आरोग्यधाम हे आयुष्मान आरोग्य मंदिराचे एक उत्तम उदाहरण आहे जिथे रुग्णांना अत्याधुनिक सुविधा या मोफत उपलब्ध आहेत.

प्रत्येक गोष्ट मोफत देणे शक्य नाही परंतु सिंबायोसिस आरोग्यधाममध्ये त्यांनी ते शक्य केले आहे व जे अत्यंत विश्वासार्ह असे आहे. सिंबायोसिस सारख्या संस्था व सरकार यांनी एकत्र येऊन आरोग्य क्षेत्रात समावेशक स्वरूपाची धोरणे तयार करावीत, असे देखील नड्डा पुढे बोलताना म्हणाले.

डॉ. शां. ब. मुजुमदार आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना म्हणाले कि, आपण सर्वजण स्वप्न पाहतो आणि देव देखील स्वप्न पाहतो. देवाच्या अनेक स्वप्नांपैकी एक म्हणजे अशी जागा निर्माण करणे जिथे मानवजात एकत्र येऊन वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना साकार करू शकेल. जर भारताला विश्वगुरू बनायचे असेल तर त्याला अध्यात्म आणि वसुधैव कुटुंबकमच्या विचारसरणीचा आधार मिळाला पाहिजे. आजकाल जगभरातील लोकांना एकत्रितपणे जोडण्यात तंत्रज्ञानाने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, असे देखील डॉ. मुजुमदार पुढे बोलताना म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech