केंद्रीय मंत्र्यांना तुटक्या सीटवर करावा लागला प्रवास
नवी दिल्ली : एअर इंडियाने केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांना भोपाळ ते दिल्ली प्रवासात तुटकी सीट अलॉट केली होती. त्यामुळे चौहान यांना त्रास सहन करत प्रवास करावा लागला. त्याबद्दल चौहन यांनी सोशल मिडीयात नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर एअर इंडिया व्यवस्थापनाने त्यांची माफी मागत भविष्यात गैरसोय होणार नाही अशी ग्वाही दिली आहे. केंद्रीय मंत्री शिवराज चौहान यांना आज एअर इंडियाच्या विमानात तुटलेल्या सीटवर बसून भोपाळ ते दिल्ली प्रवास करावा लागला. यासंदर्भात त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर एअर इंडियाने खेद व्यक्त करत शिवराज चौहान यांनी माफी मागितली आहे. चौहान आपल्या ट्विटर (एक्स) संदेशात म्हणाले होते की, , पुसा येथील शेतकरी मेळ्याचे उद्घाटन करायचे होते, कुरुक्षेत्रातील नैसर्गिक शेती अभियानाला भेटायचे होते आणि चंदीगडमधील शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करायची होती. मी एअर इंडियाच्या फ्लाइट (क्रमांक एआय-436) बुक केले होते. एअर इंडियाने मला सीट क्रमांक 8-सी दिला होती. परंतु, ही सीट तुटलेली होती आणि आतून डेंट झाली होती. त्यावर बसणे अतिशय वेदनादायक होते. यासंदर्भात फ्लाईट अटेंडंटना विचारले असता त्यांनी सांगितले की, एअर इंडिया व्यवस्थापनाला ही सीट चांगली नाही आणि तिकीट विकू नये असे आधीच कळवले होते.
शिवराज पुढे म्हणाले की, सहप्रवाशांनी मला खूप विनंती केली की त्यांची जागा बदलून चांगल्या सीटवर बसा, पण माझ्या फायद्यासाठी मी दुसऱ्याला का त्रास देऊ? या आसनावर बसून मी माझा प्रवास पूर्ण करायचा, असे ठरवले. टाटा व्यवस्थापनाने कारभार हाती घेतल्यावर एअर इंडियाची सेवा सुधारली असेल असा माझा समज होता, पण तो माझा भ्रम ठरला. मला बसण्याच्या गैरसोयीची काळजी नाही, पण प्रवाशांकडून पूर्ण रक्कम वसूल केल्यानंतर त्यांना खराब आणि त्रासदायक सीटवर बसवणे हे अनैतिक आहे. ही प्रवाशांची फसवणूक नाही का ? भविष्यात कोणत्याही प्रवाशाला अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही याची खात्री करण्यासाठी एअर इंडिया व्यवस्थापन पावले उचलेल का किंवा प्रवाशांच्या लवकर पोहोचण्याच्या नाईलाजाचा फायदा घेत राहील ? असे प्रश्न चौहान यांनी उपस्थित केले होते. त्यांनी ट्विटरवर केलेल्या या तक्रारीनंतर एअर इंडिया व्यवस्थापनाने केंद्रीय मंत्र्याला झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त करत माफी मागीतली आहे. . एअर इंडियाने म्हटले आहे की, “तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. कृपया खात्री बाळगा, भविष्यात अशी कोणतीही घटना घडू नये म्हणून आम्ही या प्रकरणाकडे काळजीपूर्वक पाहत आहोत. तुमच्याशी बोलण्याची संधी मिळाल्याने आम्हाला आनंद होईल, कृपया आमच्याशी संपर्क साधण्यासाठी सोयीस्कर वेळी आम्हाला थेट संदेश पाठवा असे एअर इंडियाने म्हंटले आहे.