पश्चिम हवाई मुख्यालयाच्या प्रमुख पदी एअर मार्शल जितेंद्र मिश्रा

0

नवी दिल्ली : एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी बुधवारी, ०१ जानेवारी रोजी भारतीय हवाई दलाच्या पश्चिम हवाई मुख्‍यालयाच्‍या प्रमुखपदाची जबाबदारी स्‍वीकारली. एअर मार्शल पंकज मोहन सिन्हा हे दि. ३१ डिसेंबर २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले, त्‍यांनी भारतीय हवाई दलामध्‍ये ३९ वर्षांहून अधिक उल्लेखनीय सेवा केली. एअर मार्शल पंकज मोहन सिन्‍हा यांच्‍याकडून आता एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी कार्यभार स्‍वीकारला आहे. एअर मार्शल मिश्रा भारतीय हवाई दलामध्‍ये ०६ डिसेंबर १९८६ रोजी लढाऊ वैमानिक म्हणून रूजू झाले होते. ते पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे, बंगलोरच्‍या एअर फोर्स टेस्ट पायलट स्कूलचे, तसेच अमेरिकेच्‍या एअर कमांड अँड स्टाफ कॉलेजचे आणि यूकेच्‍या रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीजचे माजी विद्यार्थी आहेत. लढाऊ विमानाचे वैमानिक म्हणून आणि प्रायोगिक चाचणी वैमानिक म्हणून, एअर मार्शल मिश्रा यांना ३००० तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे.

३८ वर्षांच्या आपल्या सेवा कारकिर्दीत, एअर मार्शल मिश्रा यांनी महत्त्वाच्या विविध पदांवर कार्य केले. यामध्ये फायटर स्क्वॉड्रनचे कमांडिंग ऑफिसर, एअरक्राफ्ट अँड सिस्टीम टेस्टिंग एस्टॅब्लिशमेंट (एएसटीई) चे मुख्य चाचणी वैमानिक, दोन फ्रंटलाइन एअर बेसचे एअर ऑफिसर कमांडिंग, डायरेक्टर (ऑपरेशनल प्लॅनिंग अँड असेसमेंट ग्रुप), प्रधान संचालक (एएसआर) आणि सहाय्यक हवाई प्रमुख यांचा समावेश आहे. हवाई मुख्यालय (वायूभवन) मधील कर्मचारी (प्रकल्प), कमांडंट एएसटीई आणि एकात्मिक संरक्षण कर्मचारी उपप्रमुख (डॉक्ट्रीन, संस्था आणि प्रशिक्षण) म्हणूनही त्यांनी काम केले. या नवीन नियुक्तीपूर्वी ते एकात्मिक संरक्षण कर्मचारी (ऑपरेशन्स)चे उपप्रमुख होते. हवाई अधिकारी जितेंद्र मिश्रा यांनी आपल्‍या सेवा कार्यकाळामध्‍ये ‘अति विशिष्ट सेवा पदक’ आणि ‘विशिष्ट सेवा पदक’ प्राप्त केले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech