नवी दिल्ली – भारतीय वायूसेना आपला 92वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी सज्ज झाली असून या निमित्ताने 6 ऑक्टोबर 2024 रोजी चेन्नईच्या आकाशात चित्तथरारक हवाई कसरतींचा समावेश असलेला एयर शो केला जाणार आहे. “भारतीय वायूसेना- सक्षम, सशक्त, आत्मनिर्भर” ही या वर्षाच्या कार्यक्रमाची संकल्पना असून देशाच्या हवाई क्षेत्राचे संरक्षण करण्यामधील अविचल बांधिलकी अधोरेखित करणारी आहे.
या दिवशी चेन्नईच्या जनतेला मंत्रमुग्ध करण्यासाठी वायूसेनेची 72 विमाने हवाई कसरतींमध्ये सहभागी होऊन आपल्या हवाई कौशल्याचे आणि समन्वयित उड्डाणाचे दर्शन घडवतील. सकाळी 11 वाजता चेन्नईच्या मरिना बीचवर हा कार्यक्रम होणार आहे. यापूर्वी 8 ऑक्टोबर 2023 रोजी प्रयागराज येथे संगम भागात अशा प्रकारच्या चित्तथरारक कसरती आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्याचा आनंद लाखो प्रेक्षकांनी घेतला होता. यावेळी देखील तशाच प्रकारचा प्रतिसाद अपेक्षित आहे. भारतीय वायूसेनेचे अतिशय महत्त्वाचे स्कायडायव्हिंगच्या कौशल्यासाठी ओळखले जाणारे आकाशगंगा हे पथक, आकाशात अतिशय जवळून तयार केल्या जाणाऱ्या रचनांसाठी ओळखले जाणारे सूर्यकिरण एरोबॅटिक पथक आणि अतिशय रोमहर्षक हवाई कोरियोग्राफीसाठी ओळखले जाणारे सारंग हेलिकॉप्टर डिस्प्ले पथक यांच्या कसरती या हवाई शोमध्ये पाहायला मिळणार आहेत.
भारतीय वायूसेनेच्या या अतिशय प्रसिद्ध पथकांव्यतिरिक्त वायूसेनेच्या ताफ्यात असलेल्या इतर विमानांच्या हवाई संचलनाचा आणि कसरतींचा देखील हवाई शो मध्ये समावेश आहे. यामध्ये स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक आणि वजनाने हलक्या तेजस या लढाऊ विमानाचा, तसेच वजनाने हलके लढाऊ हेलिकॉप्टर प्रचंड आणि पूर्वीच्या काळी वापरली जाणारी हवाईदलाच्या ऐतिहासिक वारशाची साक्ष देणारी डाकोटा आणि हार्वर्ड ही विमाने यांचा देखील यात समावेश असू असेल.
6 ऑक्टोबर 2024 रोजी मरिना बीचवर होणाऱा हा भव्य शो सर्वांसाठी खुला आहे. हा कार्यक्रम उपस्थितांना एक अविस्मरणीय अनुभव देणारा असेल. यामध्ये भारताच्या हवाई गुणवत्तेचेच नव्हे तर भारतीय वायूसेनेचे सामर्थ्य आणि क्षमतेचे, आणि देशाच्या हवाई क्षेत्राचे रक्षण करण्यामधील त्याच्या महत्त्वाच्या भूमिकेचे देखील दर्शन घडेल.