मध्यप्रदेशात तोतया डॉक्टरने घेतला ७ जणांचा जीव

0

युपीच्या प्रयागराज येथून बनावट डॉक्टरला अटक
दामोह : मध्यप्रदेशच्या दामोह येथे हृदयरोग्यांवर शस्त्रक्रिया करून ७ जणांचा जीव घेणाऱ्या तोतया डॉक्टरला अखेर उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे. नरेंद्र यादव असे या बोगस डॉक्टरचे नाव असून तो गेल्या काही दिवसांपासून फरार होता. बनावट डॉक्टर नरेंद्र विक्रमादित्य यादव याने आपण लंडनचे सुप्रसिद्ध कार्डियोलॉजिस्ट डॉ. एन. जॉन कॅम असल्याचे सांगितले होते. तो जानेवारी महिन्यात दामोहच्या रूग्णालयात रुजू झाला होता. त्याने किमान १२ ते १५ शस्त्रक्रिया केल्या होत्या. यातील ७ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर फेब्रुवारीत तो गायब झाला. सखोल तपासानंतर असे लक्षात आले की, नरेंद्र यादव याने युनायटेड किंग्डममधील सुप्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ प्रा. जॉन केम यांच्या नावाचा दुरूपयोग केला. प्रा. केम यांनी इमेलद्वारे तसेच सोशल मीडियावर त्यांच्या नावाचा दुरूपयोग केला जात असल्याचे लक्षात आणून देत या बोगस डॉक्टरविषयी इशारा दिला होता.

यादवच्या विरोधात दाखल गुन्ह्यात नमूद केल्यानुसार या बोगस डॉक्टरची मध्य प्रदेश वैद्यकीय परिषदेत कोणतीही वैध नोंदणी नाही. त्याच्या कागदपत्रांवर नोंदणी नाही आणि आंध्र प्रदेश वैद्यकीय परिषदेच्या अधिकृत पोर्टलवरही त्याची नोंदणी उपलब्ध नाही. रुग्णालयाने त्याला नोंदणी करणाऱ्या संस्थेचे म्हणून दाखवले. पण ती कागदपत्रे संशयास्पद होती. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या वैद्यकीय पथकानेही दुजोरा दिला आहे. रुग्णालयाने नंतर अधिकाऱ्यांना सांगितले की डॉ., नरेंद्र यादव उर्फ कॅम रुग्णालय सोडून गेला.

पोलिसांनी बनावट कागदपत्रे तयार करणे, फसवणूक, लुबाडणे आणि गुन्हेगारी कटाशी संबंधित भारतीय दंड संहिता कलम ३१५ (४), ३३८, ३३६(३), ३४०(२) आणि ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.बोगस डॉक्टरने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा परिषदेच्या अधिकृत सत्यापन क्रमांकांशिवाय बनावट डिग्री प्रमाणपत्रे आणि नोंदणी कागदपत्रे सादर केली होती. त्यामुळे रूग्णालय व्यवस्थापकही तपासाच्या रडारवर आहेत.

दमोह जिल्ह्यातील दीपक तिवारी यांनी या प्रकरणाची तक्रार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे केली. त्यात म्हटले आहे की, ७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत रूग्णांच्या कुटुंबियांना समजावून सांगून त्यांच्याकडून मोठी फी वसूल केली आणि शवविच्छेदन न करता मृतदेह नातेवाईकांना परत दिले गेले. एकूण मृत्यूंच्या संख्येबाबत सखोल चौकशी करावी. आरोपी डॉक्टर आणि रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर हत्येचा गुन्हा दाखल करावा. तसेच रुग्णालयाची नोंदणी रद्द करावी असे त्यांनी म्हंटले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech