अकोला- वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार आहे. एकाकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करीत आहेत. तर दुसरीकडे आता आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्यासाठी ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांना यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण देण्यात आल्याने आता मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या आरक्षण बचाव यात्रेच्या पत्रकार परिषदेत आंबेडकर यांना ओबीसी नेते छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे यांना घेणार का? असा प्रश्न आंबेडकरांना विचारण्यात आला होता. तेव्हा आम्ही कुणाला नाही म्हणत नाही. भुजबळांना यायचं असेल यावं. मुंडेंनी यायचं असेल यावं, हाके आणि वाघमारे यांनीही यावं. कुणालाही दरवाजे बंद नाहीत, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं होत. आता भुजबळ यांच्या निमंत्रणाचे पत्रच प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन सुरू केलं आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर राज्यात आता एससी, एसटी, ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत. या आरक्षण बचाव यात्रेला 25 जुलैला दादरच्या चैत्यभूमीतून सुरुवात होणार आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना या जिल्ह्यांमध्ये ही यात्रा जाणार आहे. यानंतर 7 किंवा 8 ऑगस्टला तारखेला या यात्रेची छत्रपती संभाजीनगरमध्ये सांगता होणार आहे. विशेष म्हणजे या यात्रेला आंबेडकरांनी मंत्री छगन भुजबळ यांना निमंत्रण दिलं आहे. ओबीसी आरक्षण बचाव यात्रा चैत्यभूमी, मुंबई येथून सुरू होणार असून त्याच दिवशी पुण्यातील महात्मा फुले वाड्यालाही भेट देण्यात येणार आहे. तर या यात्रेत सहभागी होण्यासाठी ओबीसी आंदोलकांसह, काही बड्या नेत्यांनाही निमंत्रण पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे मनोज जरांगे एकटे पडणार की काय अशी चर्चा होऊ लागली आहे. आता जरांगे हे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात बरेचदा वाद विकोपाला गेले आहेत. अनेकदा शाब्दिक हल्लेही दोघांनी एकमेकांवर केले आहेत. दोघांमध्ये वाकयुद्ध सुरू होतं, दोघेही एकमेकांवर एकेरी भाषेत बोलत खोचक अशा टीका करत होते ज्या अजुनही सुरू आहेत. मराठा समाजाला आरक्षण द्या पण ओबीसींमधून न देता वेगळे द्या आमचा त्याला विरोध नसल्याची छगन भुजबळ यांची भूमिका आहे. पण आता मराठा समाजाला सगेसोयऱ्यांची मागणीसाठी जरांगे माघार घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे आता वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. आता आंबेडकर यांच्याकडून भुजबळ यांना निमंत्रण देण्यात आल्याने राजकारण आणखी तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.