मुंबई – बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या बनावट चकमकीत हत्येनंतर, त्याचे वडील महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांकडे मदतीची मागणी करत आहेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांच्या परिवाराला संरक्षण देण्याची विनंती केली आहे.अक्षय शिंदेच्या वडिलांनी आरोप केला आहे की, चकमक बनावट होती आणि याबाबत न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. त्यांनी म्हटले आहे की, खटल्यामुळे त्यांना आणि त्यांच्या परिवाराला धमक्या मिळत आहेत. त्यांच्या वकील अमित कटारनवरे यांनाही धमक्या मिळत असून, त्यांच्या मुलीवर बलात्कार करण्याच्या धमक्याही दिल्या गेल्या आहेत.
अक्षय शिंदेच्या वडिलांनी पत्रात नमूद केले की, कटारनवरे यांच्यावर २०१७ मध्ये दोन प्राणघातक हल्ले झाले असून, पोलिसांना आरोपींना अटक करण्यात अपयश आले आहे. कटारनवरे यांच्यावर नांदेडमध्ये देखील जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. त्यांनी अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत विविध खटल्यांत पीडितांची बाजू मांडली आहे, त्यामुळे त्यांना धोका आहे.अक्षय शिंदेच्या वडिलांनी पत्रात किरीट सोमय्या यांच्याप्रमाणे, किंवा त्याहून अधिकचे संरक्षण देण्याची मागणी केली आहे, कारण त्यांच्यावर सत्ताधारी आणि माफिया समूहांकडून धोका असल्याचा दावा केला आहे.
माझे वकील अमित कटारनवरे हे अनेक गुन्ह्यातील पिढीतांची बाजू न्यायालयात मांडत असून तसेच ते अॅट्रॉसिटी (अत्याचारास प्रतिबंध) कायद्यातील किमान २० गुन्ह्यात पीडित आहेत. त्यामुळे जिवीतास धोका असल्याची बाब माझे वकील अमित कटारनवरे यांनी केंद्रीय गृह विभाग तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात या आधी ईमेलद्वारे कळवली आहे. तरीही माझे वकील अमित कटारनवरे यांचा परिवार तसेच मी आणि माझ्या परिवाराच्या जीवितास किरीट सोमय्या यांच्या तुलनेत अधिकचा धोका सत्ताधारी, राजकीय, माफिया व त्यांच्या चेले चपाट्याकडून आहे. त्यामुळे किरीट सोमय्याच्या तुलनेत अधिकचे संरक्षण प्रधान करावे, अशी विनंती अक्षय शिंदेच्या वडिलांनी पत्रातून केली आहे.