उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
मुंबई : अनंत नलावडे
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बळकटीकरणा साठी राज्यात सुरू असलेली इमारत बांधकामे पुढील पन्नास वर्षांचा विचार करून दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. वक्फ मंडळासमोरील समस्या सोडवण्यासाठीही राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
वक्फ मंडळाशी संबंधित विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मंत्रालयातील समिती कक्षात आज एक विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ,अल्पसंख्यांक विकास व औकाफमंत्री दत्तात्रय भरणे,नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा,वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, अल्पसंख्यांक विकास व औकाफ विभागाचे सचिव रुचेश जयवंशी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉनसन (दूरदृश्य प्रणालीद्वारे), छत्रपती संभाजीनगर येथील वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी, मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, राज्यातील मुस्लिम समाजाला गुणवत्तापूर्ण शिक्षण,आरोग्य सेवा आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात,यासाठी सरकार कटिबद्ध आहे.मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजाच्या गरजा लक्षात घेऊन योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. समाजातील युवकांना रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षण मिळावे, यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील,असेही त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.
बैठकीत वक्फ मंडळाच्या संपत्ती व्यवस्थापन,निधी वितरण,शिक्षण आणि इमारत प्रकल्पांशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित विभागांना कार्यवाहीसाठी सूचना देत वक्फ मंडळाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचेही आवाहन पवार यांनी केले.