देश प्रत्येक क्षेत्रात प्रथम क्रमांकाचे स्थान प्राप्त करण्याचा संकल्प – अमित शहा

0

रायगड : प्रत्येक क्षेत्रात भारताला जगात सर्वोत्कृष्ट बनवण्याची संकल्पना सर्वप्रथम शिवाजी महाराजांनी मांडली. आज भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर, आम्ही जगासमोर अभिमानाने उभे आहोत आणि जेव्हा भारत स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण करेल, तेव्हा देश प्रत्येक क्षेत्रात जागतिक स्तरावर प्रथम क्रमांकाचे स्थान प्राप्त करेल, असा संकल्प करत असल्याचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रात रायगड किल्ल्यावर आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित केले. या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की जिथे हिंदवी स्वराज्याचे सुवर्ण सिंहासन स्थापित झाले होते, त्या ऐतिहासिक रायगड किल्ल्याला भेट देणे ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे. ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी भारताच्या कानाकोपऱ्यात स्वधर्म, स्वभाषा आणि स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती जागृत केली आणि पाहता-पाहता आदिलशाही, मुघल आणि निजामशाही साम्राज्याने वेढलेल्या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्यात रूपांतर झाले. पुढे काही वर्षांतच, अटकेपासून कटकपर्यंत आणि दक्षिणेकडील बंगालपासून तामिळनाडूपर्यंत देशभर स्वराज्याचे स्वप्न साकार होऊ लागले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की जेव्हा शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा देशातील जनता अंधःकारात बुडाली होती. असे वातावरण होते की स्वराज्याची कल्पना करणेही अशक्य वाटत होते. देवगिरीच्या पतनानंतर अवघ्या शंभर वर्षांतच महाराष्ट्र आणि संपूर्ण दक्षिणेकडील प्रदेशाचा ऱ्हास झाला आणि हळूहळू स्वतःच्या धर्माबद्दल आणि स्वराज्याबद्दल बोलणे हा गुन्हा मानले जाऊ लागले. मात्र अशा काळात, आपली आई राजमाता जिजाबाईंपासून प्रेरित होऊन, एका १२ वर्षांच्या मुलाने सिंधू नदीपासून कन्याकुमारीपर्यंत पुन्हा एकदा भगवा ध्वज फडकवण्याची प्रतिज्ञा केली. शाह म्हणाले की त्यांनी जगभरातील अनेक महान नेत्यांची चरित्रे वाचली आहेत, परंतु अशी अढळ इच्छाशक्ती, अदम्य साहस , अकल्पनीय रणनीती आणि समाजाच्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन अजेय सैन्य उभारण्याची क्षमता, अशी वैशिष्ट्ये – छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय अन्य कोणाच्याही अंगी आढळली नाहीत.

राजमाता जिजाबाईंनी तरुण शिवरायांवर मूल्ये आणि सद्गुणांचे संस्कार केले आणि शिवरायांनी त्या मूल्यांचे महान वटवृक्षात रूपांतर केले, असे शाह म्हणाले‌, ते पुढे म्हणाले की शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, संताजी आणि तानाजी यांनी मुघल सम्राट औरंगजेबाविरुद्ध मरेपर्यंत लढा दिला. परिणामी, स्वतःला “आलमगीर” (जग जिंकणारा) म्हणवून घेणारा माणूस शेवटी महाराष्ट्रात पराभूत झाला आणि त्याची समाधी इथेच त्याचा पुरावा म्हणून राहिली. भारतातील प्रत्येक बालकाला शिवाजी महाराजांचे जीवन आणि वारसा याविषयी माहिती करून देणे हे आपले कर्तव्य आहे यावर शाह यांनी भर दिला. ते म्हणाले की शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित राहू नयेत, संपूर्ण देश आणि जगालाही त्यांच्यापासून प्रेरणा मिळू शकते.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की स्वधर्म, स्वराज्य आणि स्वभाषा या बाबी मानवी जीवनातील स्वाभिमानाशी खोलवर जोडलेल्या आहेत. शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाची ही तीन मूलभूत मूल्ये राष्ट्र आणि जगासमोर आणली. त्यांनी हे अशा वेळी केले जेव्हा आक्रमकांनी आपल्याला चिरडून टाकले होते आणि पराभूत केले होते, तसेच समाजात गुलामगिरीची मानसिकता रुजली गेली होती. परंतु शिवाजी महाराजांनी ही पराधीनतेची मानसिकता मोडून काढली आणि हिंदवी साम्राज्याची पुनर्स्थापना केली, लोकांमध्ये अभिमान, प्रतिकार आणि स्वातंत्र्याची भावना पुन्हा जागृत केली. अमित शहा म्हणाले की शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास – त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत – रायगडाच्या या पवित्र भूमीशी जोडलेला आहे. या पवित्र स्थानाची कल्पना “शिवस्मृती” म्हणून करणारे महान स्वातंत्र्यसैनिक बाळ गंगाधर टिळक यांचेही स्मरण त्यांनी केले.

शाह म्हणाले की इंग्रजांनी जाणूनबुजून रायगड किल्ला नष्ट करण्याचा प्रयत्न केला, कारण तो स्वराज्याचे एक शक्तिशाली प्रतीक होता. टिळकांनी हे महत्त्व ओळखले आणि “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” या त्यांच्या प्रसिद्ध घोषणेद्वारे, शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या दृष्टिकोनाशी असलेली बांधिलकी पुन्हा स्थापित केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेला भारतीय नौदलाचे प्रतीक बनवले, आणि या कृतीतून आपला देश आणि आपले स्वराज्य पूर्णपणे सुरक्षित असल्याचा संदेश जगाला दिला असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र सरकार, १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश व्हावा यासाठी प्रयत्न करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech