अमित शाहांनी दिलेल्या संकेतांची राजकीय वर्तुळात चर्चा

0

सांगली – केंद्रात भाजपाचे सरकार आहे, तसे राज्यात महायुतीचे सरकार बनवा. हे दोन्ही सरकार महाराष्ट्राला नंबर एकचे राज्य बनवायचे काम करतील, असे केंद्रीय गृहमंत्री तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह म्हणाले. मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्र नंबर वन होऊ शकतो. मी मागील महिन्यात महाराष्ट्रातील प्रत्येक भागात फिरलो, त्या सगळीकडे एकच चर्चा आहे, महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे आहे, हीच इच्छा सर्वसामान्यांची आहे. सांगलीतील शिराळा येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. या माध्यमातून सत्ता आल्यावर फडणवीस मुख्यमंत्री होणार, असे शाहांनी संकेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली. यावेळी आम्ही शरद पवार आणि राहुल गांधींना बोलावले, पण त्यांनी पुन्हा अयोध्येत येईन असं सांगितलं. पण अजूनही ते अयोध्येला गेलेले नाही, त्यांना त्यांच्या व्होट बँकेचे भीती वाटते म्हणून ते अजूनही अयोध्येला गेलेले नाही. शाह पुढे म्हणाले, काँग्रेसचे अध्यक्षच सांगतात काँग्रेस जी आश्वासनं देतं ती काल्पनिक आहेत, ती कधीच पूर्ण होणार नाहीत. पण मी आज तुम्हाला सांगतो, मोदींनी जी आश्वासने दिलीत ती आम्ही पूर्ण केली आहेत. महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचे, उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला तर काँग्रेसमध्ये डझनभर नेते मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत.
काही दिवसापूर्वी मोदींनी वक्फ बोर्डाचे विधेयक आणले, या विधेयकालाही या लोकांनी विरोध केला. आघाडीचे सरकार जर सत्तेत आले, तर शेतकऱ्यांची जमीन वक्फ बोर्डाच्या नावावर होईल. आम्ही शेतकऱ्यांच्या जमिनीला हात लावू देणार नाही, असंही शाह म्हणाले. महाराष्ट्रात औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हायला पाहिजे, पण आघाडीवाले याला विरोध करत आहेत. उद्धव ठाकरेंचा याला विरोध आहे, शरद पवार तुम्ही कितीही जोर लावा आम्ही औरंगाबादला संभाजीनगर हे नाव देणारच. जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम पुन्हा आणण्याचा यांचा प्रयत्न आहे, पण आम्ही तो पुन्हा येऊ देणार नसल्याचे शहा यांनी यावेळी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech