पुणे – आगामी काळात महाराष्ट्रातील सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असे भाकीत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील गाव वाड्या-वस्त्यांना भेटी देऊन या भागाचा दौरा केला. यावेळी तेरुंगण (ढगेवाडी) येथे उपस्थितांना मार्गदर्शन करताना कोल्हे बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, देशाचे नेते शरद पवार यांनी सुरुवातीला आदिवासी बांधवांसाठी स्वतंत्र बजेट काढले, जेव्हा जेव्हा आदिवासी बांधव अडचणीत, संकटात असतील तेव्हा शरद पवार त्यांच्या मागे ठाम उभे राहिले आहेत. याची उतराई म्हणून आदिवासी बांधव हे आजपर्यंत शरद पवारांना विसरले नाहीत त्याचे उदाहरण म्हणजे आताची लोकसभा निवडणूक आहे. आता दोन-तीन महिने राहिले आहेत. महाराष्ट्राचे हे सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले.