नवी दिल्ली : देशात आज पाचव्या टप्प्यामध्ये सरासरी 65 टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये पाचव्या टप्प्यातही सर्वाधिक 79 टक्के, तर महाराष्ट्रात सर्वात कमी 55 टक्के मतदानाची नोंद झाली. 6 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 49 मतदारसंघांमध्ये आज मतदान झाले. बिहारमध्ये 5 जागांसाठी, महाराष्ट्र (13), उत्तर प्रदेश (14), प.बंगाल (7), झारखंड (3), ओडिशा (5), जम्मू आणि काश्मीर (1) आणि लडाखमध्ये एका जागेसाठी मतदान झाले. पाचव्या टप्प्यात जे लक्ष्यवेधी उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी (रायबरेली), केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (अमेठी), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (लखनौ), बाहुबली नेते ब्रजभूषण शरण सिंह यांचे पुत्र कर्णभूषण सिंह (कैसरगंज), दिवंगत राम विलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान (हाजीपूर), राष्ट्रीय जनता दलचे सर्वेसर्वा बिहारचे माजी मुख्यमंत्री लालुप्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य (सारण), भाजपा नेते पियुष गोयल (मुंबई उत्तर), नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला (बारामुल्ला) यांचा समावेश आहे.
रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी करीत असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राहुल गांधी गो बॅक असे नारे त्यांनी दिले. दुसरीकडे राहुल गांधी आज रायबरेली सकाळपासून ठाण मांडून होते. प्रत्येक मतदान केंद्रावर जाऊन ते मतदानाचा आढावा घेत होते. प. बंगालमध्ये काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटनांनी मतदान प्रक्रियेला गालबोट लागले. बराकपूर, बोंगाव आणि अमरबाग मतदारसंघात भाजपा आणि तृणमूल काँग्रेसेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. काही मतदान केंद्रांवर पोलिंग एजंटना अडविण्यात आल्याच्या तक्रारी आल्या. तर ईव्हीएम बंद पडल्याच्या दोन हजारहून अधिक तक्रारी आल्या. त्याव्यतिरिक्त एकूण पं. बंगालमध्ये मतदान शांततेत पार पडले, असा दावा निवडणूक आयोगाने केला. भाजपाच्या तिकिटावर मंडी मतदारसंघातून रिंगणात असलेली बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणावत लाहौल जिल्ह्यातील काझा येथे प्रचाराच्या रॅलीमध्ये तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी कंगनाला काळे झेंडे दाखवले. मंडीमध्ये सातव्या आणि अंतिम टप्प्यात 1 जून रोजी मतदान होणार आहे.
देशाची टक्केवारी-58.96%, ओडिशा 61.96, प.बंगाल 73.14, जम्मू काश्मीर 56.02, बिहार 53.55, झारखंड 63.06,महाराष्ट्र 49.01, उत्तर प्रदेश 57.79, लडाख 68.47