मुंबई : ट्रान्स एशियन चेंबरच्या २६व्या वर्धापन दिनाच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमात सुप्रसिद्ध आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना प्रतिष्ठित “द पिलर ऑफ हिंदुस्तानी सोसायटी” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार माजी डीजीपी डॉ. परमिंदरसिंग पसरिचा यांच्या हस्ते रॉयल यॉट क्लब येथे प्रदान करण्यात आला.
या विशेष सोहळ्याला ट्रान्स एशियन चेंबरचे अध्यक्ष प्रविण लुंकड, कार्यकारी अध्यक्ष उदय नाईक, उपाध्यक्ष डॉ. संजय भिडे, डॉ. अरूण सावंत, प्रकाश जोशी, अभिजीत देसाई तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये ग्रॅहॅम लंडन, अर्जेंटिनाचे कॉन्सुल जनरल दानियल क्वेर कोन्फालोनिएरी, बेलारूसचे कॉन्सुल जनरल आलेक्सांद्र मात्सुकोवु, इराण दूतावासातील कॉन्सुल डॉ. रेझा सयेदन, तुर्की दूतावासातील व्हाइस कॉन्सुल राबिया कारताल, बेलारूस दूतावासातील कॉन्सुल कान्स्तांतिन पिनचुक, इथियोपियाचे राजदूत फेस्सेहा शावेल गेब्रे आणि घानाच्या दिल्लीतील दूतावासातील ट्रेड कॉन्सुल कॉनराड नाना कोजो असिदेऊ यांचा समावेश होता.
पुरस्कार स्वीकारताना अनिल गलगली यांनी समाजहितासाठी सतत कार्यरत राहण्याचा संकल्प व्यक्त केला आणि माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून पारदर्शकता व जबाबदारी वाढवण्यासाठी केलेल्या योगदानाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली.