मुंबई – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तेलंगणाप्रमाणे सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, राज्यातील शेतकऱ्यांना अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करावा लागत आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, बि-बियाणे आणि खते महाग झाली आहेत. अशा परिस्थितीत, शेतकऱ्यांना आधार देणे सरकारचे कर्तव्य आहे.तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे, त्यामुळे महायुती सरकारनेही संकटात सापडलेल्या बळीराजाला सरसकट कर्जमाफी द्यावी.
पटोले यांनी इशारा दिला की, जर महायुती सरकारने कर्जमाफी दिली नाही, तर सत्तेवर आल्यावर महाविकास आघाडीचे पहिले काम शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे असेल. पटोले यांनी सांगितले की, राज्यातील काही भागात कोरडा दुष्काळ तर काही भागात ओला दुष्काळ आहे. बोगस खते-बियाण्यांचा सुळसुळाट आहे आणि पीक विम्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, आणि मागील ६ महिन्यांत १७२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
पटोले यांनी आरोप केला की महायुती सरकार फक्त लाडक्या बिल्डर आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी काम करत आहे. अनिल अंबानी यांचे १७०० कोटी रुपये माफ करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत, पण शेतकऱ्यांसाठी नाहीत. केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी विरोधी आहे.११ जून २०२४ रोजी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन कर्जमाफीची मागणी केली होती, परंतु सरकारने अद्याप त्यावर काही पाऊल उचललेले नाही. पटोले यांनी आश्वासन दिले की, महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाईल.