नेप्यिडॉ : म्यानमार मध्ये पुन्हा एकदा रविवारी (दि.१३) पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले आहे. या भूकंपाची तीव्रता ५.१ रिश्टर स्केलवर इतकी मोजण्यात आली आहे. सध्या यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, सकाळी ०७ वाजून ५४ मिनिटांनी म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.१ इतकी होती. या भूकंपाचे केंद्र जमिनीच्या आत १० किलोमीटर खोलीवर होते. सध्या या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
२८ मार्च २०२५ रोजी म्यानमारमध्ये एक भयानक भूकंप झाला. मंडाले प्रदेशात झालेल्या या भूकंपाची तीव्रता ७.७ इतकी होती. या भूकंपामुळे देशात मोठे नुकसान झाले. हा भूकंप म्यानमारच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी भूकंपांपैकी एक होता. म्यानमार सैन्याच्या म्हणण्यानुसार, या भूकंपात ३६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ५ हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. याशिवाय शेकडो लोक त्यांच्या कुटुंबांपासून वेगळे झाले.
या भूकंपामुळे मोबाईल कम्युनिकेशन सिस्टीमचेही गंभीर नुकसान झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, भूकंपामुळे एकूण ६,७३० संपर्क केंद्रांचे नुकसान झाले होते, त्यापैकी सुमारे सहा हजारांची दुरुस्ती करण्यात आली आहे. भारत, चीन आणि अमेरिका सारख्या देशांनी तसेच संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन युनियन सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनीही म्यानमारला मदत करण्यासाठी मदत आणि बचाव पथके, वैद्यकीय पथके आणि आवश्यक संसाधने पाठवली.