मुंबई – महाराष्ट्र पोलिस दलाला ५६६ कोटी रुपयांच्या खर्चातून २२९८ नवीन वाहने मिळणार आहेत. गृह विभागाने या महत्त्वपूर्ण खरेदीला मंजुरी दिली आहे. या खरेदीत पोलिस अधिकाऱ्यांसाठी वाहने, पिक अप व्हॅन, एसी डॉग व्हॅन, ट्रक, वॉटर टँकर, बस, आणि जोरात पाणीफवारा करणारी ‘वरुण’ वाहने यांचा समावेश आहे.
नालासोपाऱ्यातील तुळींज पोलिस ठाण्याने आरोपींना न्यायालयात नेण्यासाठी रिक्षाचा वापर केल्याच्या घटनेनंतर राज्य मानवी हक्क आयोगाने सुमोटो दखल घेतली. आयोगाने वाहनांच्या कमतरतेबद्दल राज्य सरकारकडे विचारणा केली होती, ज्यावर पोलिस महासंचालक कार्यालयाने २२९८ वाहनांची कमतरता असल्याचे मान्य केले.
आयोगाच्या आदेशानुसार, राज्य सरकारने ही खरेदी प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. २०२४ ते २०२८ या चार वर्षांच्या कालावधीत ही वाहने खरेदी केली जाणार आहेत, ज्यामुळे राज्याच्या तिजोरीवर ५६६.७८ कोटी रुपयांचा भार येणार आहे. गृह विभागाने या खरेदीचा आढावा घेण्यासाठी पोलिस महासंचालक कार्यालयाला वेळोवेळी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील पोलिस दलाची कार्यक्षमता वाढणार असून, त्यांच्या दैनंदिन कामकाजात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.