मुंबई – शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या आणखी एका नव्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. “गणपती उत्सव, नवरात्र उत्सव हे आता इव्हेंट झाले आहेत. हिंदू समाजाला गांडू बनवत आहेत”, असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. तसेच “महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात”, असंदेखील वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता विविध स्तरावरुन टीका केली जात आहे. संभाजी बिग्रेडचे नेते संतोष शिंदे यांनी संभाजी भिडे यांना त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अटक करण्याची मागणी केली आहे. “मनोहर उर्फ संभाजी भिडे हा अत्यंत विकृत माणूस आहे. हिंदू स्त्रिया असो की हिंदू समाज यांच्या विषयी नेहमी वादग्रस्त वक्तव्य करत असतो. समाजा समाजात जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा आणि महाराष्ट्रात दंगली घडवणारा मनोहर भिडे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. राज्यात जातीवादी वाईट घटनेचा मास्टरमाईंड आहे. अशा विकृत व्यक्तीला सरकारने पाठीशी घालू नये”, असं संभाजी ब्रिगेडचे नेते संतोष शिंदे म्हणाले आहेत.
“हिंदूंना महामुर्ख आणि गांडू म्हणणाऱ्या मनोहर उर्फ संभाजी भिडे याला तात्काळ अटक करून सरकारने कायदेशीर कडक कारवाई करावी, अशी संभाजी ब्रिगेडची सरकारकडे मागणी आहे. भिडेच्या वक्तव्याला सरकार नेहमी पाठीशी घालत आहे. सरकारने हिंदूंना महामूर्ख म्हणणाऱ्या या वक्तव्याला गप्प बसून पाठिंबा देऊ नये. अन्यथा सरकारची भूमिका महाराष्ट्राच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. भिडेला तात्काळ आता अटक करा”, अशी मागणी संतोष शिंदे यांनी केली आहे.