नवी दिल्ली – दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी कारागृहात असलेल्या अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. सुप्रीम कोर्टातील न्या. सूर्यकांत आणि न्या. उज्जल भुईया यांच्या खंडपीठाने हा काही अटी शर्थींसह केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. दोन दिवसांत आपण जनतेशी संवाद साधून राजीनामा देणार असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. केजरीवाल रविवारी सकाळी दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या कार्यालयात पोहचले. यावेळी त्यांनी 2 दिवसात राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. याप्रसंगी केजरीवाल म्हणाले की, मला दिल्ली आणि देशातील जनतेला विचारायचे आहे की केजरीवाल प्रामाणिक आहेत की गुन्हेगार ? मी दोन दिवसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केंद्र सरकारला तुरुंगाच्या आतून सरकार का चालवता येत नाही, असा सवाल केला, तर आम्ही सरकार चालवू शकतो हे सिद्ध केले आहे. मी सर्व गैर-भाजप मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की, तुम्हाला अटक करण्याचा प्रयत्न झाला तर घाबरू नका. आम आदमी पक्षाने त्यांचा नवा फॉर्म्युला फेल केला आहे. त्यांच्या सर्व कारस्थानांचा मुकाबला करण्याची ताकद आज आम आदमी पक्षाकडे आहे कारण आपण प्रामाणिक आहोत. ते आमच्या प्रामाणिकपणाला घाबरतात, कारण ते अप्रामाणिक आहेत. देशातील जनतेला मी बेईमान वाटत असेल तर मी एक मिनिटही खुर्चीवर बसणार नाही, खुर्ची सोडेन. त्यांनी माझ्यावर पीएमएलए या देशातील सर्वात कठोर कायद्यानुसार आरोप लावले. पण मला कोर्टातून जामीन मिळाला. मी न्यायालयाचा खूप आभारी आहोत. माझी निर्दोष मुक्तता होईपर्यंत मी खुर्चीवर बसणार नाही, असे माझे मन सांगत असल्याचे अरविंद केजरीवाल म्हणाले.
जोपर्यंत जनता निकाल देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही. तुम्ही तुमचा निर्णय द्याल तेव्हा मी त्या खुर्चीवर जाऊन बसेन. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी आता हे का बोलत आहे, त्यांनी माझ्यावर आरोप केला आहे की केजरीवाल चोर आहेत, भ्रष्ट आहेत, मी या कामासाठी आलो नाही. प्रभू राम 14 वर्षांनी वनवासातून परतले तेव्हा माता सीतेला अग्नीपरीक्षा सहन करावी लागली. आज मी तुरुंगातून परतलो आहे, मला अग्निपरीक्षा पार करावी लागणार आहे. फेब्रुवारीमध्ये निवडणुका आहेत. या निवडणुका महाराष्ट्रासह नोव्हेंबरमध्ये व्हाव्यात, अशी माझी मागणी आहे. जोपर्यंत तुमचा निर्णय येत नाही तोपर्यंत मी जबाबदारी स्वीकारणार नाही आणि जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत माझ्या जागी आम आदमी पक्षाचा कोणीतरी मुख्यमंत्री होईल. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत पुढील नाव निश्चित होणार आहे. मनीष सिसोदिया हे देखील स्वतःची काळजी तेव्हाच घेतील जेव्हा दिल्लीची जनता प्रामाणिक आहे असे म्हणेल. आम्ही दोघे तुमच्यामध्ये येऊ. तुम्ही प्रामाणिक आहात, असे जनतेने सांगितले तर आम्ही या खुर्चीवर बसू. आज मी तुमच्यामध्ये आलो आहे, जर मी प्रामाणिक असेल तर मतदान करा, नाहीतर मत देऊ नका असे केजरीवाल यांनी सांगितले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज, रविवारी राजीनाम्याची घोषणा केली. आगामी 2 दिवसात जनतेशी संवाद साधून राजीनामा देणार असल्याचे केजरीवाल यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाहीर केले.