भंडारा : हिवाळ्यात निसर्गसौंदर्य खुलून दिसते. निसर्ग, वनराई, डोंगररांगा, हिरवे शेतशिवार, तुडुंब भरलेले तलाव, जलाशय असे मनमोहक व आल्हाददायक वातावरण असल्याने या ऋतूत पर्यटन व निसर्गसहलीचा आनंद लुटला जातो. भंडाऱ्यात जिल्ह्यात लाभलेले निसर्गवैभव, जलश्रीमंती पर्यटकांना आकर्षित करत आहे. भंडारा जिल्ह्याला निसर्गाचं जणू वरदान लाभलं आहे. त्यात नैसगिक सौंदर्याची उधळण पाहण्यासाठी पर्यटकांचीही कमी नाही. हिवाळा सुरू झाल्याने पर्यटकांची पावले जिल्ह्याकडे वळत असून कोका जंगल सफारीला पहिली पसंती मिळत आहे.