नवी दिल्ली – दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी मार्लेना यांच्या नावावरच अखेर शिक्कामोर्तब झालं असून आता शीला दीक्षित यांच्यानंतर जवळपास एका तपानंतर दिल्लीला पुन्हा एकदा महिला मुख्यमंत्री लाभणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावरून बरीच चर्चा पाहायला मिळाली. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात अनेक नावांची चर्चा झाली. मात्र, अरविंद केजरीवाल नेमकं कुणाचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी प्रस्तावित करतात? याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. या चर्चेत आधी सर्वात वर नाव होतं ते उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचं. मात्र, त्यांनी आधीच हे पद स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांच्या खालोखाल नाव होतं दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी मार्लेना यांचे.
आम आदमी पार्टी विधीमंडळ पक्षाची बैठक आज पार पडली. या बैठकीत आतिशी यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. आपच आमदारांनी देखील आतिशी यांच्या नावाच्या प्रस्तावाचं स्वागत केलं. आतिशी येत्या दोन ते तीन दिवसांत दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.