बदलापूर – बदलापूरात विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवणाऱ्या विद्याल्यातच अंगावर काटा येणारी घटना घडली. बदलापूर पूर्वेला असणाऱ्या आदर्श शाळेतील दोन विद्यार्थींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकारानंतर सुरुवातीला शाळा प्रशासन आणि पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. जेव्हा पीडित मुलींचे पालक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना तेथील महिला पोलीस अधिकाऱ्याकडून तब्बल १२ तास ताटकळत ठेवण्यात आले. मात्र, या प्रकरणावरुन गदारोळ निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. पोलिसांकडून याप्रकरणात चालढकल केल्याचे समोर आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची ठाणे नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली. मात्र, यानंतरही पालक आणि बदलापूरमधील नागरिकांचा रोष शमलेला नाही. बदलापूरमधील नागरिकांनी मंगळवारी शहरात बंदची हाक दिली . राज्य सरकारच्या मंत्रीमंडळातील प्रतिनिधीला घटनास्थळी येताचा नागरिकांचा आक्रोशाचा सामना करावा लागला.
या घटनेनंतर शाळेच्या मुख्याध्यापिका, संबंधित वर्गशिक्षिका आणि दोन सहायक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. मात्र, शाळा प्रशासनाने अद्याप याबाबत पालकांसोबत समोरासमोर चर्चा केलेली नाही. शाळेचे प्रशासन बोलायला तयार नसल्याने पालक सध्या प्रचंड संतापले आहेत. त्यांना शहरातील नागरिकांची साथही मिळाली आहे. मंगळवारी सकाळी बदलापूरमधील संतप्त नागरिकांचा मोर्चा शाळेच्या गेटवर धडकला. याठिकाणी नागरिकांकडून प्रचंड घोषणबाजी करण्यात आली. मात्र, शाळा चालवणाऱ्या प्रशासनातील कोणत्याही व्यक्तीने पालकांना सामोरे जाण्याचे धारिष्ट्य दाखवलेले नाही.
नागरिकांचा जमाव शाळेच्या गेटवर धडकून तीन तास उलटले तरी शाळा प्रशासनाकडून कोणीही चर्चेला आलेले नाही. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. याप्रकरणात पोलीस कोणावर कारवाई करणार, हेदेखील बघावे लागेल. शाळा प्रशासनाकडून केवळ एक माफीनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. मुलींवर अत्याचार करणाऱ्या सफाई कर्मचारी पुरवणाऱ्या कंत्राटदारासोबतचा करार रद्द करण्यात आला आहे. सर्व पालक वर्गाची शाळेने जाहीर माफी मागितली आहे. घडलेला प्रकार दुर्दैवी, घृणास्पद आणि निंदनीय आहे. संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर शिक्षा व्हावी यासाठी संस्थेचा आग्रह आहे. आरोपीविरोधात पूर्ण क्षमतेने संस्थेने पोलिसांना आम्ही सहकार्य केले, असे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.