नाशिक – ११ व्या शतकात महानुभाव संप्रदायातील गुरू श्री गोविंद प्रभू यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजहितासाठी व समाजाच्या कल्याणासाठी व्यतीत केले. स्त्री आणि शूद्र यांनाही समाजातील अन्य घटकांप्रमाणेच भक्ती व उपासना करून आपला उद्धार करून घेण्याचा अधिकार आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून समाजाला पटवून दिले. त्यांनी तत्कालीन समाजातील अन्यायमूलक रूढींवर प्रहार करून ते सर्व समाजघटकांत समभाव व सौहार्द निर्माण केले. त्याकाळी अस्पृश्यता फार मोठ्या प्रमाणात होती. या अस्पृश्यतेला गोविंद प्रभुनी वाचा फोडली. गोविंदप्रभु हे महाराष्ट्रातील परिवर्तनाचे आधारस्तंभ आहे असून भगवान गोविंद प्रभू, श्री चक्रधर स्वामी सामाजिक समतेचे आद्यप्रवर्तक असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
महानुभाव पंथांच्या विविध मंदिरांसाठी भरीव निधी तसेच महानुभाव पंथाच्या विविध कार्यक्रमांसाठी वेळोवेळी विशेष योगदान दिल्याबद्दल अखिल भारतीय महानुभाव परिषद प्रणित नाशिक जिल्हा व येवला तालुका महानुभाव परिषदेच्या वतीने मंत्री छगन भुजबळ यांना महंत सुकेणकर बाबा, महंत चिरडेबाबा, महंत यशराज बाबा शास्त्री यांच्या हस्ते ‘धर्मभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात येऊन गौरविण्यात आले. या पुरस्कारात मंत्री छगन भुजबळ यांना भगवान विष्णूची मूर्ती देऊन गौरव करण्यात आला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी येवला तालुका महानुभाव समिती यांच्यावतीने भगवान श्री गोविंद प्रभू जयंती उत्सवाचे माऊली लॉन्स,विंचूर रोड,येवला येथे आयोजन करण्यात आले होते. या आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार मारोतीराव पवार, माजी आमदार नरेंद्र दराडे, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद राधाकिसन सोनवणे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, महंत सुकेणकर बाबा, महंत चिरडेबाबा, महंत यशराज बाबा शास्त्री, लासलगाव बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर जगताप, जयदत्त होळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, मच्छिंद्र थोरात, गुणवंत होळकर महिला अध्यक्षा राजश्री पहिलवान, तानाजी आंधळे, ज्ञानेश्वर आंधळे यांच्यासह पदाधिकारी व महानुभाव पंथातील अनुयायी उपस्थित होते.
ते म्हणाले की, वैदिक परंपरेला नाकारून स्त्री-शूद्रांसह सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणाऱ्या सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचे नाव महाराष्ट्रातील समाजसुधारकांमध्ये अग्रक्रमाने घ्यावे लागेल.भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींच्या भक्तीच्या प्रेरणेतून जे साहित्य त्यांच्या भक्त व अनुयायांकडून निर्माण झाले त्यामुळे मराठी साहित्यपरंपरेची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी स्व.प्रा.हरी नरके यांनी लिळाचरित्र हा प्रमुख ग्रंथाचा आधार शासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले.