मुंबई : रथसप्तमी आणि जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक येथील मानवता कॅन्सर सेंटरमध्ये ‘संक्रांतीचे वाण तिच्या आरोग्याचे भान ’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली महिलांमध्ये कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक जिल्हा शिवसेना समन्वयक श्रीमती श्यामल दीक्षित यांनी केले होते. यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कॅन्सर तज्ज्ञ डॉ. राज नगरकर यांच्याकडून मानवता कॅन्सर सेंटरमधील उपचार पद्धतींबाबत माहितीही जाणून घेतली आणि त्यांच्या सह मानवताच्या उपक्रमांचे कौतुक केले.
*स्त्री आरोग्यासाठी जागरूकता महत्त्वाची – डॉ. नीलम गोऱ्हे*
कार्यक्रमात बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी महिलांच्या आरोग्याबाबत असलेल्या समज-गैरसमजांवर प्रकाश टाकला. “महिलांना स्वतःच्या आरोग्याची पुरेशी जाणीव नसते. त्यांची आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात . त्यामुळे स्त्रियांमध्ये कॅन्सर व इतर गंभीर आजार वाढत आहेत,” असे त्या म्हणाल्या. त्यांनी पुढे सांगितले की, अनेकदा महिलांना आजार असल्याचे माहिती असूनदेखील सामाजिक दबावामुळे त्या सांगत नाहीत . यामुळे त्यांचे आरोग्य अधिक बिघडते. यासाठी महिलांनी स्वतःच्या तब्येतीकडेही लक्ष द्यावे आणि वेळच्या वेळी वैद्यकीय तपासण्या करून घ्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांमध्ये कर्करोगासह इतर आरोग्यविषयक तपासण्या सोबत त्याविषयीच्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न स्तुत्य असल्याचे त्यांनी विशद केले . “स्त्रिया एकमेकींशी संवाद साधून आणि उपलब्ध योजनांचा लाभ घेत आपले आरोग्य सुधारू शकतात.तसेच त्यांनी आपली नकारात्मकता आणि ताण कमी करावा “असा सकारात्मक संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी दिला.
किरणोपचार विभागाचे तज्ञ डॉ. विजय पालवे यांनी पुढे कॅन्सरविषयी मार्गदर्शन केले.स्त्रियांनी शरीरातील गाठी वेळीच तपासणे गरजेचे आहे ,यामुळे स्तनाच्या कर्करोगाचे वेळीच निदान होऊ शकते.गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी देखिल वेळीच तपासणी करण्याचे महत्व सांगताना ते म्हणाले की भारतात दुर्दैवाने या कर्करोगाने बाधित स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे.कर्करोग टाळण्यासाठी ९ ते १८ वर्षाच्या मुलींना लस उपलब्ध आहे,त्याचा वापर करावा.नियमित आरोग्य तपासणी, योग्य आहार आणि व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्त्व देखिल त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी नाशिक जिल्हा समन्वयक ॲड. शामला दीक्षित म्हणाल्या, “स्त्रियांमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. मात्र, योग्य वेळी लसीकरण व तपासणी केल्यास हा आजार रोखता येऊ शकतो. सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी.”
*शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती*
या कार्यक्रमाला नाशिक जिल्हा समन्वयक श्रीमती श्यामल दीक्षित, दिंडोरी लोकसभा जिल्हाप्रमुख मंगला भास्कर, ॲड. श्रद्धा कुलकर्णी जोशी, नाशिक महानगर प्रमुख अस्मिता देशमाने, इगतपुरी ग्रामीण जिल्हाप्रमुख पूजा धुमाळ, नाशिक उपजिल्हाप्रमुख आशा पाटील आणि लिनेस क्लबच्या अंजली विसपुते,एडव्होकेट असोसिएशन सदस्या,यांच्यासह मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.