केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला महत्त्वाचा निर्णय
नवी दिल्ली – देशात आता 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या सर्व वृद्धांना आयुष्मान आरोग्य कवच योजनेंतर्गत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. यासंदर्भात वैष्णव म्हणाले की, या निर्णयामुळे 12.3 कोटी कुटुंबांना फायदा होणार आहे. याचा फायदा 6.5 कोटी वृद्धांना होणार आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ही एक नवीन श्रेणी असेल. या अंतर्गत सरकार 70 वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधेसह आरोग्य विमा देणार आहे. तसेच 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी हे सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज असेल. एकूण 12.3 कोटी कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. जी कुटुंबे आधीच आयुष्मान भारत योजनेचा भाग आहेत, त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती 70 वर्षांपेक्षा जास्त वयाची असल्यास, त्यांना वर्षाला 5 लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त टॉप-अप मिळेल. हे शेयर्ड आरोग्य कवच असेल असे वैष्णव यांनी सांगितले.