अमरावती : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील म्हसावद स्टेशनवर अप लूप लाइनचे ७९४ मी. करून ७५६ मी.पर्यंत विस्तारीकरण करण्यात येत आहे. तसेच गती वाढीकरणासाठी यार्डच्या पुनर्रचनेचे काम हाती घेण्यात आले आहे. परिणामी नॉन इंटरलॉकिंग कामे आणि ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे बडनेरा-नाशिक रोड, नाशिक रोड-बडनेरा मेमू ट्रेन २६ मार्चपर्यंत रद्द केली आहे. विशेष म्हणजे मध्य रेल्वेने डिसेंबर २०२४ पासून हा तिसरा ब्लॉक घेतला असून, तिसऱ्यांदा काही दिवसांसाठी मेमू रद्द केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
गाडी क्र. 01212 नाशिक रोड ते बडनेरा व गाडी क्र. ०९२१९ बडनेरा ते नाशिक रोड या दोन्ही अप डाऊन मेमू गाड्या रद्द असल्यामुळे या मेमूने अकोला, शेगाव, भुसावळ येथे दररोज कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. सकाळी ११.०५ वाजता ही मेमू बडनेरा स्टेशनवरून निघते व रात्री ७.४० वाजता नाशिक रोड स्टेशनवर पोहोचते. त्याचप्रमाणे नाशिक रोड येथून ही मेमू दररोज रात्री ९.१५ वाजता निघून पहाटे ४.३५ वाजता बडनेरा येथे पोहोचते. संत नगरी शेगाव येथे जाण्यासाठी ही मेमू फारच उपयोगी आहे. त्यामुळे शेगावपर्यंत या मेमूत चांगलीच गर्दी असते. तसेच बसण्यास जागाही मिळते. तिकीटही फार जास्त नसल्याने मेमूने शेगाव, भुसावळपर्यंत जाण्यास प्राधान्य दिले जाते.
प्रत्येक ब्लॉकचा मेमूला फटका
प्रवाशांना त्रास सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपयोगी ठरणाऱ्या बडनेरा-नाशिक रोड मेमू ट्रेनला प्रत्येक लहान, मोठ्या ब्लॉकचा फटका बसतो. सर्वप्रथम मेमूच रद्द केली जाते. त्यामुळे प्रवाशांना नाईलाजाने इतर पर्यायी वाहनांचा वापर करावा लागतो. डिसेंबरपासून मेमू ट्रेन तिस-यांदा रद्द केली आहे. बडनेरा स्टेशनवर प्लॅटफॉर्मचे काम सुरू असताना ती २० दिवस बंद होती. तसेच किमान तीन ते चार दिवस प्रत्येकी दोनदा बंद ठेवण्यात आली.