सोलापूर – अयोध्येतील राम मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवल्याची घटना ताजी असतानाच आता पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरातून बालाजीचे मंदिर हटवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरु आहे. गेल्या वर्षभरापासून हे काम रडतखडत सुरु आहे. मंदिराचे काम संथगतीने सुरु असल्याची भाविकांची ओरड असतानाच मंदिरातील बाजीराव पडसाळी समोरील बालाजीचे पुरातन दगडी मंदिर हटवण्यात आल्याने भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, येथे नवीन मंदिर बांधण्यात येणार असल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले आहे. येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे पुरातन आहे. मंदिराला सुमारे सातशे वर्षांपूर्वीचा प्राचीन इतिहास आहे. अशा या प्राचीन विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने सुमारे 74 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षभरापासून मंदिर संवर्धनाचे काम सुरु आहे. वर्षभरात पन्नास टक्के हून कमी काम झाले आहे. मागील काही दिवसांपासून तर अत्यंत धिम्यागतीने काम सुरु आहे. त्यामुळे दर्शन व्यवस्था वारंवार विस्कळीत होते. एकीकडे मंदिरातील काम संथ गतीने सुरू असतानाच दुसरीकडे मात्र मंदिरातील बालाजीचे मंदिर हटवण्यात आले आहे. त्यामुळे विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाविकांना बालाजीचे दर्शन दुर्लभ झाले आहे.