मुंबई – महाराष्ट्र, कर्नाटकासह गोवा आणि इतर राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आदमापूर येथील संत सद्गुरु बाळूमामा मंदिर मतदानादिवशी म्हणजेच ७ मे रोजी भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. असे पत्र उपविभागीय अधिकारी, कोल्हापूर लोकसभा, राधानगरी विधानसभा मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वसुंधरा बारवे यांनी बाळूमामा मंदिराच्या प्रशासकांना पाठवले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरू आहे. ४७ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मंगळवारी मतदान होणार आहे. या दिवशी अमावस्या असून बाळूमामांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येणार आहेत. त्यामुळे या दिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच या दिवशी पोलीस कर्मचारीही मतदान केंद्रावर व इतर ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. ही परिस्थिती विचारात घेऊन ७ मे रोजी एक दिवसासाठी बाळूमामा मंदिर बंद ठेवणेच योग्य आहे. ८ मेपासून मंदिर पुन्हा दर्शनासाठी खुले ठेवण्यात येईल, असे पत्रात म्हटले आहे. या निर्णयाची प्रत जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनाही पाठविण्यात आली आहे.