विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा सरकारवर गंभीर आरोप..,
मुंबई – अनंत नलावडे
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर फक्तं ६ महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्या प्रकरणी रोज नवे नवे आरोप सत्तारुढ महायुती सरकारवर होत असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी एक्स या समाज माध्यमावर व्यक्त होताना आणखी एक धक्कादायक व गंभीर आरोप केल्याने यातील गूढ आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आज एक्स वर बोलताना वडेट्टीवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत आक्रमक होत थेट आरोप केला की, या सरकारने फक्तं टक्केवारी खाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना पण सोडले नाही.आधी सत्तेसाठी पक्षाचा सौदा करून गद्दारी केली आणि आता टक्केवारी खाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा सौदा केला.
ते पुढे म्हणाले की,लोकसभा निवडणूक प्रचारासाठी नियम धाब्यावर बसवून घटनाबाह्य सरकारने नियमबाह्य पद्धतीने कामे केल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला हे धक्कादायक सत्य आता बाहेर आले असून कला संचानालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी कोसळलेल्या पुतळ्याबाबत धक्कादायक माहितीही आम्हाला दिलेली आहे.
मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात कुठेही महापुरुषांचा पुतळा उभारायचे झाल्यास पुतळ्याचे अगोदर क्ले मॉडेल सादर करून परवानगी घ्यावी लागते.आणि मालवण येथील महाराजांच्या केवळ ६ फुटाच्याच क्ले मॉडेल ला परवानगी देण्यात आली होती.मात्र नियम धाब्यावर बसवून चक्क ३५ फुटांचा पुतळा उभारला. आणि परवानगी नसलेल्या पुतळ्याचे अनावरण चक्क देशाच्या पंतप्रधान यांच्या हस्ते झालं? अशी माहितीही वडेट्टीवार यांनी दिली.
इतकेच नाही तर,या कार्यक्रमाला पंतप्रधान येणार म्हणून तीन हेलिपॅड बनवले गेले.३० नोव्हेंबरला हेलिपॅडच्या कामासाठी टेंडर काढले गेले आणि मात्र ३ दिवसात निविदा प्रक्रिया पूर्ण करून २ कोटी ३ लाख रुपये खर्चून चक्क ३ हेलिपॅड सरकारने बनवून दाखवले. त्यामुळे ज्या वेगाने ही कामे झाली तशी जनतेची कामे राज्यात का होत नाही..? असा परखड सवाल केला. मात्र हे सरकार फक्त इव्हेंट करायला बसलेले असून त्या प्रत्येक इव्हेंट मधून कमिशन ओरबाडून कसे खाता येईल एवढच काम मंत्रालयात सुरू असल्याचाही आरोप करत वडेट्टीवार यांनी थेट महायुती सरकारवरच निशाणा साधला.