मुंबई – पंतप्रधान मोदी हे दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर असून ते सोमवारी मॉस्को येथे दाखल झाले. त्यानंतर ते पुतिन यांच्या निवासस्थानी पोहोचले. यावेळी पुतिन यांनी पंतप्रधान मोदींचं जोरदार स्वागत केलं. पुतिन आणि मोदी यांनी गळाभेटही घेतली. व्लादिमीर पुतिन म्हणाले, सर्वप्रथम तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. मला वाटतं की हा विजय काही योगायोग नाही. हा निकाल तुमच्या सरकारच्या अनेक वर्षांच्या कामाची पोचपावती आहे. देशातील जनतेसाठी भल्यासाठी काय करायला हवं, याची जाणीव तुम्हाला आहे. तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य देशातील जनतेसाठी समर्पित केलं आहे आणि भारतातील जनतेलाही याची जाणीव आहे.
पुतिन यांच्या स्वागतानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांचे आभार मानले. पुतिन यांनी ज्याप्रकारे माझं स्वागत केलं, ते बघून मी भारावून गेलो आहे. या स्वागतासाठी मी त्यांना धन्यवाद देतो. बदल घडवणं हे माझं आयुष्याचे ध्येय आहे. देशातील जनतेने माझ्या योजनांचा स्वीकार करत मला तिसऱ्यांदा पंतप्रधान केलं आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच द्विपक्षीय दौरा आहे. तसेच रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी हे रशियात पोहोचले आहेत. दरम्यान, आज पंतप्रधान मोदी हे रशिया आणि भारत यांच्यातील २२ व्या शिखर संम्मेलनात सहभागी होणार आहेत. यावेळी दोन्ही देशातील आर्थिक व राजनीतीक संबंध मजबूत करण्यावर दोन्ही नेत्यांचा भर असणार आहे.