पाटना – लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाचं बहुमत हुकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मित्रपक्षांच्या साथीने सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली कराव्या लागत आहेत. एकीकडे सरकार स्थापन करण्यासाठी भाजपा आणि एनडीएतील मित्रपक्षांनी सरकार स्थापन करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलेले असतानाही, इंडिया आघाडीतील नेत्यांकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहे. बिहारमधील पूर्णिया मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत विजयी झालेले पप्पू यादव यांनीही एक मोठा दावा केला आहे. जर केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन होणार असेल तर पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी यांच्यापेक्षा चांगला पर्याय समोर असू शकत नाही.
ते पुढे म्हणाले की, पूर्णियामधून पप्पू यादव विजयी होऊ नये, असे संपूर्ण माफिया सिस्टिमला वाटत होते. मात्र पूर्णियामधील जनतेमध्ये राहायचे आणि त्यांच्याशी असलेले नाते पार पाडायचे, हे माझे लक्ष्य होते. दरम्यान, आरजेडीबाबत असलेल्या मतभेदांबाबत त्यांनी सांगितलं की, बिहारमध्ये काँग्रेसला उत्तर प्रदेशसारखा सन्मान मिळाला नाही. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने १७ जागांवर निवडणूक लढवली आणि अखिलेश यादव यांच्यासोबत एका कौटुंबिक नात्यासारखे काम झाले. विशेषत: प्रियंका गांधी यांनी खूप मेहनत घेतली. मात्र बिहारमध्ये राहुल गांधी यांनी केवळ ९ जागा घेत सारे काही दिले असेही पप्पू यादव म्हणाले.
दरम्यान, पप्पू यादव यांनी बिहारमधील पूर्णिया लोकसभा मतदारसंघातून जेडीयूचे उमेदवार संतोष कुशवाहा यांना सुमारे १६ हजार मतांनी पराभूत केले. दरम्यान, आरजेडीकडून बाजूल टाकण्यात आल्याच्या आरोपांबाबत पप्पू यादव म्हणाले की, पप्पू पप्पू यादवला साक्षात देवही बाजूला करू शकत नाही. तसेच लालूप्रसाद यादव हे माझ्यासाठी पित्यासारखे आहेत असा दावाही त्यांनी केला.