नेपाळ दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रती पाच लाखांची मदत केली जाणार
जळगाव – आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड लखपती दीदी संमेलनाच्या माध्यमातून महिलांनी उपस्थित राहून तोडले आहे. सगळे विक्रम मोडीत काढले आहेत. सर्व ठिकाणी महिलाच महिला दिसत आहे. जळगाव ही सोन्याची भूमी आहे. जळगावचे सोने बावनकशी आहे, मात्र माझ्या लाडक्या बहिणी देखील सोन्यापेक्षाही सरस आहेत. म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आज जळगावात लखपती दीदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावली व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांचा सत्कार केला.
लखपती दीदी योजना आणि माझी लाडकी बहीण योजना या योजनांमुळे बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद फुलला आहे. राज्यातील या बहिणी सरकारला भरभरून आशीर्वाद देत आहेत. महिलांना उच्च शिक्षण मोफत दिले जात आहे, प्रवासात सवलती दिल्या जात आहेत, महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकार काम करत आहे. महिलांना आत्मसन्मान मिळत आहे. आधी आरक्षणावर फक्त चर्चा होत होती मोदीजींनी ते करून दाखवले. म्हणून सगळ्यांच्या वतीने त्यांच्या आभार मानतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
ते पुढे म्हणाले, आज एक करोड लखपती दीदी स्वतःच्या हिमतीने बळावर आपल्या परिवाराचे पालनपोषण करीत आहेत. महाराष्ट्राने मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजना सुरू करून खऱ्या अर्थाने पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्याची सुरुवात केली आहे. देशातल्या तीन कोटी लखपतीदींमध्ये महाराष्ट्रातील २५ ते ५0 लाखांपेक्षा जास्त दीदी लखपती झालेल्या असतील याचा समाधान महाराष्ट्राला आहे. ही क्रांतिकारी योजना प्रगत देशातल्या महिलांच्या सर्वांगीण विकासात पथदर्शी ठरेल यात शंका नाही अन्नपूर्णा योजने अंतर्गत तीन गॅस सिलिंडर देत आहोत. महिलांना ३३ टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला. ३ कोटी लखपती दीदी बनवण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल. २५ हजार ३० कोटींची कर्जे स्वयं सहायता गटांना देण्यात आली आहे. त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात आहे.
देशाला महाशक्ती बनवण्यासाठी महिलांची भागीदारी आवश्यक आहे. ७६ हजार कोटींच्या वाढवण बंदर विकासाला सहाय्य केले. मेट्रो प्रकल्पाला मदत केली. कांदा, कापूस, दूध, सोयाबीन यांना चांगला दर मिळण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री महोदयांनी लक्ष घालावे. याशिवाय, सिंचन प्रकल्पांना मदत करावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. नेपाळ येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीय प्रती पाच लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.