अखेर मुहूर्त निघाला, भाग्यश्री आत्राम 12 सप्टेंबर ला तुतारी पकडणार

0

गडचिरोली – राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मोठी मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी बंडखोरी करून येत्या १२ सप्टेंबरला त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचे निश्चित झाले आहे. अहेरी येथे नव्यानेच उभारलेल्या वासवी सेलिब्रेशन सभागृहात त्या जेष्ठ नेते जयंत पाटील व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा श्री गणेशा करणार आहे.

६ सप्टेंबर ला आलापल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ‘जनसन्मान’ यात्रा पार पडली. यावेळी अहेरी विधानसभेतून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांसमोर मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी मुलगी भाग्यश्री आत्राम आणि जावई ऋतुराज हलगेकर यांच्या बंडाविषयी केलेल्या वक्तव्यावरून राज्यात खळबळ उडाली होती. यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यानंतर पहिल्यांदाच भाग्यश्री आत्राम ९ सप्टेंबरला गडचिरोली येथे आल्या होत्या. त्यांनी अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला भेट दिली. यावेळी त्यांना बंडाबद्दल विचारले असता, येत्या १२ सप्टेंबरला मी सर्व प्रश्नांना उत्तर देणार असे सांगितले. अहेरी येथे हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून भाग्यश्री आत्राम आणि त्यांचे पती शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. दरम्यान, ६ सप्टेंबररोजी जनसन्मान यात्रेत मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी स्वतः मुलगी आणि जावई आपल्या विरोधात उभे राहणार असून शरद पवार यांच्यावर आपले घर फोडल्याचा आरोप केला. यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा भाष्य करीत घरात फूट पडू देऊ नका, असा सल्ला भाग्यश्री आत्राम यांना दिला होता. त्यानंतर अहेरी विधानसभेत वडील विरुद्ध मुलगी असे राजकीय चित्र निर्माण झाले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech