मुंबई – वांद्रे पश्चिम येथून जाणाऱ्या मेट्रो लाईन २ बी च्या खाली ईएसआयसी नगर ते वांद्रे दरम्यान बॉलीवूड थिम साकारण्यात येणार असून आज या प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यात आले. मेट्रोलाईन 2बी च्या एकुण ७ स्टेशन व त्यामधील सुमारे 350 खांब व त्यामधील जागे मध्ये एमएमआरडीए मार्फत शिल्प, एलईडी दिवे, डिजिटल आणि अद्यावात तंत्रज्ञानाचा वापर करुन बॉलीवूड थिम साकारुन भारतीय चित्रपट सृष्टीचा गेल्या शंभर वर्षांचा इतिहास उलगडून दाखवण्यात येणार आहे. अत्यंत अनोखी अशी ही कल्पना या परिसराचे सौंदर्य तर वाढविणारी ठरणार आहेच शिवाय ती पर्यटकांचे खास आकर्षण ठरणार आहे. आज या प्रकल्पाचे वांद्रे येथे स्थानिक आमदार व मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड आशिष शेलार यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.
बॉलीवूडमधील अनेक नामवंत अभिनेते, अभिनेत्री, कलावंत, लेखक, गायक, चित्रपट निर्माते वांद्रे परिसरात वास्तव्यास असून पाली हिल, कार्टर रोड या परिसरात फिल्म स्टार यांना पहायला येणाऱ्या पर्यटकांची नेहमीच रेलचेल राहते. तर मेहबूब स्टूडिओ हाही याच परिसरात असून जुन्या अनेक चित्रपटांंससह आजही अनेक चित्रपट, वेबसिरिजचे चित्रिकरण याच भागात होत असते. बॉलीवूडचा गेल्या १०० वर्षांचा प्रचंड मोठा इतिहास हा या परिसराशी जोडलेला आहे. त्यामुळेच त्याला उजाळा देत या परिसरातून जाणाऱ्या मेट्रो लाईनचे खांब व त्यामधील जागा यावर विशेष पध्दतीने बॉलीवूड थिम साकारण्यात येणार आहे.
बॉलीवूडमधील 1913 ते 2023 या मोठया कालखंडाचा विचार करुन त्या कालखंडातील महत्वाच्या घटना, सिनेमा, त्यातील स्टार, व प्रसंगावर या थिमची रचना करण्यात येणार आहे. फिल्म इंडस्ट्रीत योगदान असलेले स्ट्युडिओ, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते या सगळ्यांचा यामध्ये समावेश असेल. याची संपुर्ण उभारणी ही अद्ययावत तंत्रज्ञानाने करण्यात येणार असून जेणे करुन त्यामध्ये रंजकता व जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे
प्रकल्प कार्यान्वयीत झाल्यावर रविवारी सकाळी रस्त्याचा काही भाग वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केला जाईल आणि बॉलीवूड थीम हॅपी स्ट्रीट कार्यक्रम सुरू केला जाईल. या जागेवर चित्रपट प्रमोशनसह बॉलिवूडशी संबंधित अनेक उपक्रम हाती घेतले जाऊ शकतात. त्यामुळे मेट्रोचे उत्पन्नही वाढू शकते. अशा पध्दतीने याची रचना करण्यात येणार आहे. आज एम एम आर डी एच्या अधिकारी आणि स्थानिक नगरसेविका अलका केरकर, स्वप्ना म्हात्रे, हेतल गाला यांच्या उपस्थितीत या कामाचे भूमीपूजन करण्यात आले.