भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश, १४ मे रोजी घेणार शपथ

0

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील प्रसिद्ध विधिज्ञ आणि आंबेडकरी चळवळीचा वारसा लाभलेले न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे सरन्यायाधीश होणार आहेत. ते ५२ वे सरन्यायाधीश म्हणून १४ मे रोजी शपथ घेणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना सरन्यायाधीश पदाची शपथ देतील. भूषण गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते, माजी आमदार, खासदास आणि विविध राज्यांचे राज्यपाल पद भूषणवलेले रा.सु. गवई आणि कमलाताई गवई यांचे पुत्र आहेत. विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना हे १३ मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी गवई यांची निवड करण्यात आली आहे. न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात २४ नोव्हेंबर १९६० रोजी झाला. मुंबईतून कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी १९८५ मध्ये वकिलीला सुरुवात केली. काही काळ त्यांनी मुंबई आणि अमरावतीमध्ये काम केले. त्यांनी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिवंगत बॅरिस्टर राजा एस. भोसले यांच्यासोबत काम केले. पुढे मुंबई उच्च न्यायालयासह नागपूर, औरंगाबाद, पणजी खंडपीठातही न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले आहे.

२००३ मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश झाले होते. त्यानंतर २००५ मध्ये कायमस्वरूपी न्यायाधीश झाले. काही काळानंतर त्यांना बढती मिळाली. ते २४ मे २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाले. आता १४ मे रोजी ते सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत. त्यांना सरन्यायाधीश म्हणून सहा महिन्यांचा काळ मिळणार आहे. ते २३ नोव्हेंबर २०२५ रोजी निवृत्त होतील. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश होणारे नागपूर बार असोसिएशनचे ते तिसरे सदस्य आहेत. यापूर्वी न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला आणि शरद अरविंद बोबडे सरन्यायाधीश झाले आहेत. न्यायमूर्ती गवई यांनी सर्वोच्च न्यायालयात काही नवीन प्रथा सुरु केल्या. त्यांनी जनहित याचिकांच्या सुनावणीसाठी आठवड्यातून एक दिवस निश्चित केला. सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी अनेक चांगले आदेश दिले. त्यांनी उत्तर प्रदेशात सुरु झालेले आरोपींच्या घरांवरील बुलडोझर कारवाईच्या विरोधात सरकारला फटकारले होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech