मुंबई – आज पासून सुरु झालेल्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने लाडक्या गणपतीचे पूजा साहित्य आणि नैवेद्यच्या खरेदीसाठी शहरातील बाजार पेठेत सर्वत्र नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. फळे-फुले आणि लाडक्या बाप्पाला चढवला जाणाऱ्या आवडीच्या नैवेद्य खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान बाप्पाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या फुलांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे दरातही १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा फुल उत्पादक शेतकऱ्यांनाही फायदा होत आहे. गणेश मूर्ती ज्या ठिकाणी विराजमान करायची आहे, ती जागा व गणेश मूर्ती आकर्षक दिसावी यासाठी शहरातील बाजार परिसरात फूल खरेदी करण्यासाठी भाविकांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे.
फुलांची मागणी वाढल्यामुळे दरात देखील मोठी वाढ झाली आहे. झेंडू, गुलाब, चमेली अशी विविध प्रकारची फुले विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. बाजारात सध्या निशिगंधा सगळ्यात महाग आहे. प्रतिकिलो खरेदी करण्यासाठी हजार ते १२०० रुपये मोजावे लागत आहेत. आवक कमी असल्याने निशिगंधा महाग झाली आहे. यंदा निशिगंधा फुलाने देखील भाव खाल्ला आहे. गणेश मूर्ती सजावटीसाठी लागणाऱ्या पांढऱ्या निशिगंधा म्हणजेच गुलछडी यंदा चांगलाच भाव खाताना दिसत आहे. झेंडू ५० ते ८० रुपये किलो शेवंती १५० ते २०० रुपये किलो गुलाब २०० रुपयाला २० फुले अॅस्टर २५० ते ३०० रुपये किलो बिजली २०० ते २५० रुपये लिली ५० रुपये किलो निशिगंधा १२०० रुपये किलो शहरातील सराफा बाजारात गणरायाला लागणाऱ्या चांदीचा मोदक, दुर्वा, मुकुट, गळ्यातील माळ, चांदीचे जास्वंदाचे फुल, पान अशा वेगवेगळ्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. लाडक्या गणरायासाठी नागरिक सराफा बाजारातून वेगवेगळ्या चांदीच्या वस्तू खरेदी करताना दिसून आले. गेल्या वर्षीपेक्षा यंदा चांदीच्या भावात वाढ झाली आहे. असे असले तरी गणेश उत्सव आनंदात साजरा करण्यासाठी नागरिक चांदीचे आभूषण खरेदी करत आहेत.