सुनावणी होईपर्यंत जामिनास स्थगिती कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय फेटाळला
नवी दिल्ली – मद्य धोरण प्रकरणी उद्भवलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका बसला असून अरविंद केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणी होईपर्यंत कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. म्हणजेच आता उच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगातून सुटणार नाहीत.
याप्रकरणी दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे. मात्र, या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरोधात ईडीने २१ जून म्हणजेच आज दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना ईडीने असा युक्तिवाद केला की, आम्हाला कनिष्ठ न्यायालयात आमचे म्हणणे मांडण्याची संधी मिळाली नाही. यावर उत्तर देताना अरविंद केजरीवाल यांच्या वकिलाने असे म्हणणे योग्य नसल्याचे सांगितले. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाविरोधात ईडीच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्याची परवानगी दिली. तसेच, या खटल्याची सुनावणी होईपर्यंत कनिष्ठ न्यायालयाचा आदेश प्रभावी ठरणार नाही असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
दरम्यान, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने गुरुवारी अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला. या आदेशाला ४८ तासांसाठी स्थगिती देण्याची ईडी विनंतीही न्यायालयाने फेटाळली होती. त्यामुळे आज अरविंद केजरीवाल हे तिहार तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र आता उच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत अरविंद केजरीवाल तुरुंगातच राहणार आहेत.