डोंबिवली : डोंबिवली विधानसभा मतदार संघात झालेल्या समोरासमोरील लढतीत महायुतीतील भाजपाचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी चौथ्यांदा विजयी षटकार मारून भरघोस मतांनी विजय संपादन केला. यावेळी 143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे माननीय ऑब्झर्वर अम्रिता सिंग व निवडणूक निर्णय अधिकारी श्री अमित शेडगे यांच्या हस्ते विजय उमेदवार श्री रवींद्र दत्तात्रय चव्हाण यांना प्रमाणपत्र देण्यात आले. रवींद्र चव्हाण यांनी महाआघाडीतील शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार दीपेश म्हात्रे याच्यावर 77 हजार 106 मतांची आघाडी घेत भाजपाचा बालेकिल्यावर शिक्कामोर्तब केले. रवींद्र चव्हाण यांना 1 लाख 23 हजार 815 मते मिळाली तर दीपेश म्हात्रे यांना 46 हजार 709 मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांनी विजयी झाल्याचे प्रमाणपत्र दिले. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.पूर्वेकडील डोंबिवली क्रिडा संकुलातील कै. सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त सभागृहात डोंबिवली विधानसभा मतदार संघासाठी मतमोजणी प्रक्रिया सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाली.
मतमोजणीसाठी एकूण 23 फेऱ्या झाल्या. प्रथम पोस्टल बॅलेट पेपर मोजणी सुरू झाली तेव्हापासून रवींद्र चव्हाण यांनी आघाडी घेतली. शेवटच्या फेरीपर्यंत चव्हाण यांनी आघाडी घेत अखेर 77 हजार मतांची आघाडी घेत विजय मिळविला. पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांना मतमोजणी आवारात प्रवेश करता येत नव्हता. परिणामी कार्यकर्त्यांचा लवाजमा घरडा सर्कल येथे तोबा गर्दी करून होता. दहाव्या फेरीनंतर चव्हाण यांचा विजय नक्की होणार असे दृष्टीपथात येताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. महिला कार्यकर्त्यांनी भाजपा झिंदाबाद, रवींद्र चव्हाण झिंदाबाद अशा घोषणा देत गुलाल उधळण सुरू केला. कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू भरवत आनंदोत्सव साजरा केला.
अखेर शेवटच्या 23व्या फेरीत रवींद्र चव्हाण यांना विजयी घोषित करण्यात आले. विजयी जल्लोषात जेसीपीच्या माध्यमातून रवींद्र चव्हाण यांच्यावर फुलांची पुष्पवृष्टी करण्यात येत होती. रस्त्याचा दुतर्फा विजयी विचारधारेचा विजय आहे असे होल्डींग लक्ष वेधून घेत होते. या विजयी जल्लोषानंतर रवींद्र चव्हाण यांनी श्रीगणेश मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी चव्हाण म्हणाले हा विजय कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा आहे. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचा हा विजय आहे. संकुलाच्या प्रवेशद्वारावर कार्यकर्त्यांनी रवींद्र चव्हाण यांना गऱ्हाढा घालून पुष्पहार घेतला आणि एकच जल्लोष केला.