मिशन मुंबईसाठी अमित शहांचा १ आणि २ ऑक्टोबर मुंबई दौरा

0

मुंबई – भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १ आणि २ ऑक्टोबर रोजी मुंबई दौऱ्यावर येत असून, आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी विशेष रणनिती आखणार आहेत. लोकसभा निवडणुकीत मुंबईत अपेक्षित यश न मिळाल्याने, विधानसभा निवडणुकीत विजय सुनिश्चित करण्यासाठी भाजपने “मिशन मुंबई” अंतर्गत जोरदार तयारी सुरू केली आहे.

अमित शाह यांचा मुंबई दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून विधानसभा निवडणुकीसाठी बुथ स्तरावर मायक्रो प्लॅनिंग करण्याचे नियोजन करणार आहेत. मुंबईतील धोकादायक मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे, जेथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा प्रभाव आहे. शाह या मतदारसंघांच्या बूथ व्यवस्थापनाची बारकाईने तपासणी करून, प्रभावी संपर्क अभियानाची आखणी करतील.

विदर्भ आणि मराठवाडा दौऱ्यानंतर आता मुंबईसाठी ही खास रणनिती तयार केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मुंबईतील चार जागांवर पराभव स्विकारावा लागला होता, ज्यामुळे विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यावर भाजपचे लक्ष केंद्रित आहे. अमित शाह यांचा हा दौरा, कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आगामी निवडणुकांसाठी दिशा देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

शाह पक्षातील महत्त्वाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून, मुंबईतील मतदारसंघांची विभागनिहाय परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली धोकादायक मतदारसंघांवर बुथ नियोजन व संपर्क योजनेसाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे.

या दौऱ्यामुळे भाजपची विधानसभा निवडणुकीसाठीच्या तयारीची गती वाढणार असून, विशेषतः मुंबईतील रणनीती अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech