अमरावती – काँग्रेसला माझ्या विरोधात आंदोलन करायचे असेल तर त्यावर मला काहीही म्हणायचे नाही. मात्र, आंदोलन करण्याआधी राहुल गांधी काय म्हणाले होते, ते देखील जनतेला सांगावे, असे आव्हान खासदार अनिल बोंडे यांनी दिले आहे. राहुल गांधी यांच्या जिभेला चटके द्यायला हवे, अनिल बोंडे यांनी असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावर आता काँग्रेसच्या वतीने त्यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. यावर अनिल बोंडे यांनी देखील पलटवार केला आहे.
माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देखील आरक्षण संपवण्याची भाषा केली होती. भारतामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही आरक्षणाची मर्यादा वाढवणार, जातीनिहाय जनगणना करणार, असा दावा राहुल गांधी यांनी केला होता. एकिकडे आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा दावा करायचा आणि दुसरीकडे अमेरिकेममध्ये जात आरक्षण संपवण्याची भाषा ते करत आहे, असा आरोप देखील बोंडे यांनी केला आहे. काँग्रेसने माझ्याविरुद्ध आंदोलन निश्चित करावे त्यांच्या आंदोलनावर मला काही म्हणायचे नाही. मात्र, राहुल गांधी आरक्षणावर काय म्हणाले होते, हे देखील जनतेचा सांगावे, असे आवाहन देखील खासदार बोंडे यांनी दिले आहे.
आरक्षणाच्या मुद्यावर वादग्रस्त विधान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जीभ छाटू नका, तिला केवळ चटके द्या, असे वादग्रस्त विधान भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केले होते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या आमदारानंतर भाजप खासदार बोंडे यांनी असे विधान केल्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यात आरक्षणाच्या मुद्यावर कथित वादग्रस्त विधान केले होते. देशात सर्वांना समान संधी मिळू लागतील, तेव्हा काँग्रेस आरक्षण संपुष्टात आणण्याच्या मुद्यावर विचार करेन. पण सध्या भारतात अशी कोणतीही परिस्थिती नाही, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांची जीभ छाटणाऱ्यास 11 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता भाजप खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या जिभेला चटके देण्याची मागणी केली होती.