मुंबई – राष्ट्रकूल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे देण्यात येणारा महाराष्ट्र विधानपरिषद ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांना जाहीर झाला आहे. मंगळवार ३ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३. ३० वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
विधिमंडळाच्या कामकाजातील नियमित सहभाग, विधिमंडळाच्या नियमांचे काटेकोर पालन, विधिमंडळात उपस्थित करावयाच्या विषयांचे आकलन, उपस्थिती, विषय मांडताना वापरलेले ज्ञान, कौशल्य, निवडलेले मुद्दे, वक्तृत्व शैली, दर्जेदार उत्कृष्ट भाषणे या सर्व गोष्टी पडताळून पाहून पुरस्कारांसाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीकडून या पुरस्काराची शिफारस केली जाते. त्यानुसार राष्ट्रकूल संसदीय मंडळाकडून हे पुरस्कार जाहीर केले जातात. भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांना ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार जाहीर झाल्याने मागाठाणे विधानसभा मतदारसंघात सर्वत्र त्यांचे कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.