नवी दिल्ली – पश्चिम बंगालमधील कूच बिहार येथील एका ३२ वर्षीय महिलेला कपडे काढून मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली आहे. भाजपने दावा केला की, पीडित महिला ही पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाची उपाध्यक्ष आहे. भाजपने यासंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला पत्र देखील लिहिले आहे.
सदर मुद्द्यावरून भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जुंपली आहे. याप्रकरणी एक टीम पाठवून तपास करण्यात यावा अशी मागणी भाजपने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे केली आहे. दुसरीकडे, तृणमूलने भाजप राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. पण, हे प्रकरण कौटुंबिक आहे.
पीडितेच्या वडिलांनी याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीमध्ये म्हटले की, माझ्या मुलीला शिव्या देण्यास सुरू केले. त्यानंतर तिचे केस पकडून तिला फरफटत नेण्यात आले आणि तिला विवस्त्र केले. त्यानंतर तिला मारहाण करून, धमकी देऊन रस्त्यावर सोडले. पीडितेच्या वडिलांनी तक्रारीमध्ये कोणत्याही राजकीय नेत्याचे किंवा पक्षाचे नाव घेतलेले नाही. पण, पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, भाजपची कार्यकर्ता असल्यामुळे त्यांच्या मुलीवर हल्ला झाला आहे. सदर प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.
हॉस्पिटलमध्ये उपचार घेणा-या पीडितेने सांगितले की, टीएमसीच्या महिलांनी तिला विवस्त्र केले आणि पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तृणमूलमध्ये प्रवेश केला नाही तर आणखी त्रास दिला जाईल असे सांगण्यात आले. बेशुद्ध झाल्यानंतर मला सोडून देण्यात आले. ४ जून पासूनच मला टार्गेट केले जात होते. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, याप्रकरणी तीन महिला आणि चार पोलिसांना अटक करण्यात आली आहे.