ठाणे – भाजपा ठाणे शहर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, कळवा-मुंब्रा आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघात भाजपाच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सर्व उमेदवांरांच्या विजयाचा संकल्प करण्यात आला. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच महायुतीच्या नेत्यांनी ठरविलेल्या उमेदवारांच्या विजयासाठी कार्य करण्याचा निर्धार भाजपाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचे रणशिंग फुंकण्यात आले.
भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्या महाअधिवेशनानंतर भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक खारकर आळीतील महाजनवाडी येथील सभागृहात उत्साहात पार पडली.
या बैठकीत सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर प्रदेश महाअधिवेशनात केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानुसार विधानसभा निवडणुकीपर्यंत कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. तर आमदार निरंजन डावखरे यांच्या सूचनेनुसार, कोकणात सहापैकी पाच जागांवर महायुतीचा झेंडा फडकविण्यात महत्वाचे योगदान असलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचेही अभिनंदन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
या बैठकीला प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांनी अभिनंदन केले. लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून खोटे नरेटिव्ह प्रस्थापित करण्यात आले होते. त्याचा मुकाबला भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने करून मतदारांना भाजपाची भूमिका पटवून द्यावी. लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचवावी, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्याबरोबरच त्यानंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी भाजपा कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. नवमतदारांच्या नोंदणीबरोबरच लोकसभा निवडणुकीत वगळलेली व गायब झालेल्या मतदारांची आवर्जून नोंदणी करून घ्यावी. माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, भाजपा महिला मोर्चा आणि भाजपा युवा मोर्चाबरोबरच मंडलांमध्येही मतदारनोंदणी शिबिरे सुरू आहेत. मतदारनोंदणीबाबत सर्व पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न स्तुत्य आहेत, अशा शब्दांत जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.