पुणे- लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जादू चालली असल्याची चर्चा सुरु असतानाच राहुल गांधी यांच्या विरोधात पुण्यात जादूटोणा विरोधी व फसवणुकीची तक्रार करण्यात आली आहे. आरती सचिन कोंद्रे या महिलेने ही तक्रार दाखल केली आहे. आपल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीच्या काळात राहुल गांधी यांनी अनेक भाषणे केली. या भाषणात ते म्हणाले होते की तुम्ही १ जूनला तूमच्या बँकेच्या खात्यात पाहा, जादूने त्यात ८ हजार ५०० रुपये जमा झालेले असतील. या प्रकारे प्रत्येक महिन्यात खटाखट, खटाखट, खटाखट हे पैसे जमा होतील. ही गोष्ट मी व्हॉटसअप, फेसबुक अशा समाजमाध्यमावरही पाहिली. माझ्या विभागात राहुल गांधी हे काळी जादू करून खात्यात पैसे टाकतील यावर अनेक महिलांचा विश्वास बसला. त्यामुळे त्यांच्या मनात काँग्रेस पक्षाबद्दलही विश्वास निर्माण झाला. नंतर त्यांना असे कळले की, असे पैसे त्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत.
त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अशा हजारो महिला माझ्याकडे येऊन त्यांनी यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी विनंती मला केली. त्यामुळे मी हा खटला दाखल केला आहे. राहुल गांधी हे जादूने पैसे जमा होतील असे कसे काय म्हणू शकतात? त्याचबरोबर ते घटनेचे रक्षण करण्याची विसंगत भूमिका घेतात. ही अशिक्षित, समाजातील तळागाळातल्या लोकांची फसवणूक आहे. हा जादूटोणा प्रतिबंधक कायद्या अन्वये गुन्हा असून देशाच्या लोकशाहीला फार मोठा धोका आहे.