सोलापूर – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शनाचा काळाबाजार सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पंढरपूरला दर्शनाला येणाऱ्या भाविकांकडून फूल विक्रेत्यांनी व्हीआयपी पदस्पर्श दर्शनाचा काळा बाजार सुरू केला असल्याची माहिती माहिती मिळताच एका फूलविक्रेत्याविरुद्ध पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमीत शिंदे असे या पेड दर्शन देणाऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी चेतन शशिकांत कबाडे (रा. वाशिंद खातवली, ता. शहापूर, जि. ठाणे) या भाविकाने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील चेतन कबाडे हे आपल्या कुटुंबासमवेत श्री. विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी आज पंढरपुरात आले होते. दर्शनासाठी मोठी गर्दी असल्याने सात ते आठ तास इतका वेळ लागत होता. त्यामुळे दाभाडे यांनी लवकर दर्शन मिळण्याची कुठे सुविधा आहे का, अशी चौकशी केली असता, त्यांना संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपाजवळ एक फूल विक्रेता आहे, त्याच्याकडून दर्शन मिळेल, अशी त्यांना माहिती मिळाली. त्यानंतर कबाडे हे दर्शन मंडपाजवळ आले व फूल विक्रेत्याकडे दर्शनाची चौकशी केली असता, लवकर दर्शन मिळेल पण त्यासाठी त्याने चार हजार रुपये लागतील, असे सांगितले. त्याची पावती तुम्हाला मिळेल. आम्हालाही वरपर्यंत पैसे द्यावे लागतात, असे सांगून कबाडे यांच्याकडून संशयित आरोपी सुमीत शिंदे याने आपल्या मोबाईलमधील स्कॅनरवर कबाडे यांच्याकडून चार हजार रुपये घेतले. त्यानंतर शिंदेने कबाडे व त्याच्यासोबत आलेल्या चौघांना मंदिरातील गेटमधून दर्शनासाठी सोडले. यावेळी कबाडे यांनी संशयित शिंदे याच्याकडे पावतीची मागणी केली असता, तुम्ही दर्शन घेऊन या मी तुम्हाला बाहेर पावती देतो, असे सांगून तो बाहेर गेला. दर्शन घेतल्यानंतर कबाडे यांनी संशयित आरोपी सुमीत शिंदे याचा पावतीसाठी शोध घेतला असता तो दिसून आला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कबाडे यांनी पैसे घेऊन विठ्ठलाचे दर्शन दिल्याची तक्रार दिली आहे. त्यांच्या या तक्रारीनंतर संशयित आरोपी सुमीत शिंदे याच्या विरोधात पैसे घेऊन विठ्ठलाचे दर्शन घडविले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.