मुंबई – मुंबईतील घाटकोपर येथील छेडानगर परिसरात महाकाय लोखंडी जाहिरात फलक वादळी वाऱ्यामुळे कोसळून पेट्रोल पंपावर पडल्याने मोठी दुर्घटना घडली. 120 X 120 चौरस फुटांचा हा फलक क्षणार्धात आदळल्यामुळे जवळ उभी असलेली वाहने आणि शंभरहून अधिक नागरिक त्यात अडकले गेले. यातील 14 जणांचा मृत्यू तर किमान 78 जखमी आहेत.
महानगरपालिकेची होर्डिंग उभारण्याची परवानगी जास्तीत जास्त 40 X 40 असून कोसळलेले होर्डिंग 120 X 120 चौरस फूट आकाराचे असल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी नियमबाह्य होर्डिंग लावण्यास परवानगी दिली. त्या सर्व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे. सदर घडलेल्या दुर्घटनेतील जागा ही रेल्वे पोलिसांच्या हद्दीत येते. यामध्ये बेकायदेशीर होर्डिंग्जला रेल्वे पोलीसांनी मान्यता दिल्याची माहिती आहे. त्यामुळे परवानगी देण्यात येणाऱ्या संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात यावेत व त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात यावेत.
तसेच, यातील काही जागा महाराष्ट्र पोलीस गृह निर्माण संस्थेच्या ताब्यात होती. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांवर तेथील जागेची जबाबदारी होती. अशा सर्व अधिकाऱ्यांवर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच होर्डिंग्ज मालकाने नियमबाह्य व सुरक्षिततेचे कोणतेही नियमांचे पालन केलेले नसल्याने त्यांच्या सर्व होर्डिंग्जची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत समावेश करावा,अशी मागणी अंबादास दानवेंनी केली.