जैसलमेर – पोकरण येथील आर्मी रेंजपासून 15 किलोमीटर अंतरावर पोकरण फील्ड फायरिंग रेंज जवळच राजस्थानच्या जैसलमेरमधील रामदेवरा भागात हवाई दलाच्या लढाऊ विमानातून आज, बुधवारी बॉम्बसदृश वस्तू पडल्याने मोठा स्फोट झाला. पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये 8 फूट खोल खड्डा तयार झाला आहे. निर्जन भागात ही घटना घडली. यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यासंदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार आज, बुधवार दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी लष्कर, बीएसएफ आणि इतर सुरक्षा एजन्सीच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली आहे. पोकरण येथील आर्मी रेंजपासून 15 किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. पोकरण फील्ड फायरिंग रेंज जवळच आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. गावातून खूप कमी उंचीवरून एक विमान उडत होते. दरम्यान, गावातील लोकवस्तीपासून एक किलोमीटर अंतरावर मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकून गावातील लोक घटनास्थळी पोहोचले.घटनेची माहिती मिळताच रामदेवरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याचे पोलिस अधीक्षक गोपाल सिंह भाटी यांनी सांगितले.
या घटनेनंतर भारतीय हवाईदलाने ट्विट करत सांगितले की, पोखरण फायरिंग रेंजजवळ तांत्रिक बिघाडामुळे, भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानातून एक एअर स्टोअर अनवधानाने बाहेर पडले. या घटनेची चौकशी करण्यासाठी भारतीय हवाई दलाला चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे ट्विटर (एक्स) संदेशात नमूद आहे.