मंदार जोग
गंधर्व बँडच्या समोर त्याचं दुकान होतं. दुकान म्हणजे रस्त्यावर असलेला जेमतेम चार बाय तीन फुटांचा लोखंडी खोका. त्यात एका गॅस वर मोठी कढई. त्यात उकळत असलेलं तेल. त्या तेलाच्या बाजूला बेसन असलेला एक मोठा डबा आणि बटाट्याच्या पांढऱ्या भाजीचे चपट गोळे. दुसऱ्या बाजूला एक पोरगा पाव कापून त्यात चटणी भरत पावांची चळत मांडत असलेला. आणि शेठ स्वतः दुकानाकडे तोंड आणि मागे उभ्या असलेल्या पंधरा वीस ग्राहकांकडे चक्क पाठ करून एक एक गोळा बेसनात बुडवून हलकेच कढई मध्ये सोडत असलेला. तोंडातून एक शब्द नाही. चेहरा अतिशय निर्विकार. वडे सोडून झाले की तो एक एक करत लोकांकडून पैसे गोळा करत असे. कढईत अजस्त्र आकाराचे वडे तयार होऊन ते बघत असलेल्या लोकांच्या तोंडाला चुळा सुटत! मग तो का कोणास ठावूक, त्या उकळत्या तेलात बोटं बुडवून हात पुसत असे.
वडे बाहेर काढल्यावर त्याचा सहाय्यक एक एक करत वडे पावात भरत असे आणि शेठ कोणी किती वडापावांचे पैसे दिले ते बरोब्बर लक्षात ठेऊन इतका वेळ ती सर्व प्रोसेस पाहणाऱ्या लोकांना अखेर वडापाव देत असे. हे चक्र संपूर्ण संध्याकाळ अव्याहत सुरू राही. त्याचा शेवटचा वडा संपेपर्यंत. त्या अवलियाच नाव होतं बोरकर. गिरगावातील सुप्रसिद्ध बोरकर वडापावचा मालक विजयानंद मोतीराम बोरकर. सगळं जग त्याला बोरकर म्हणूनच ओळखत होतं. आज त्याच्या निधनाची बातमी वाचली आणि आमच्या गिरगावातील आठवणींचा आणखी एक बुरुज कोसळला!
बोरकरचा वडापाव खाल्ला नाही असा गिरगावकर सापडणे मुश्किल. त्याचा एक वडापाव खाल्ल्यावर जवळ जवळ जेवण झाल्या इतपत पोट भरत असे. त्याची ती चटणी, आले लसूण पेस्ट घातलेली वड्याची भाजी, अजस्त्र वड्याची ती अप्रतिम चव, खाल्ल्यावर टाळ्याला चिकटून तोंडात खळबळ माजवणारा तो अफाट वडा म्हणजे गिरगावची शान होती. पुढे बोरकर ने आपला मुक्काम दोन तीन ठिकाणी हलवला. पण निर्विकार चेहऱ्याने (काही जणांना तो मुजोरपणा देखील वाटे) वडे तळणारा बोरकर, त्याच्या वडापावची चव आणि त्यावर फिदा असलेले गिरगावकर काही बदलले नाहीत. वर्षानुवर्ष ती चव आणि ते नातं अबाधित राहिले.
हळू हळू गिरगावतून मूळ गिरगावकर बाहेर फेकला गेला आणि जातो आहे. ज्या चाळींमध्ये हजारो गिरगावकर कुटुंब वसली होती तिथे आता टॉवर बनून गिरगावकरांनाच तिथे अनेकदा प्रवेश नाकारला जात आहे. टेंबे बंधू गेले, वीरकर, नाफडे, प्रल्हाद भुवन, कुलकर्णी, कोना, अनंताश्रम कालौघात विलीन झाले. परशुराम वाडी मधील वडापाव कधीच बंद झाला होता. आता बोरकर पण गेला! हळू हळू जुनं गिरगाव आणि गिरगावकर जाऊन एक वेगळंच परप्रांतीय ठिकाण तिथे निर्माण होईल! आता तर पणशीकरच्या हॉटेलात पण “छास” मिळतं! हा ह्रास आणि अधोगती गिरगावचा शेवटचा घास घेईल ते बघायला आमची पिढी कदाचित नसेल!
असो. पण जोवर आम्ही आहोत तोवर पुरष्या, पोंक्षे, हरी, मगन, लोबो सायकलवला, प्रकाश करंदीकर भटजी, कुलकर्णी भजीवाले, कोना, वीरकर, नाफडे, साहित्य संघ मंदिर, अरुण भट क्लास, डिजिटी क्लासेस, ज्ञानलता क्लासेस, गाझी क्लासेस, घाडीगावकर सर, शशी आणि दामुची बुर्जी, क्रांती नगर बाहेरची भजी आणि उसळ पावची गाडी, भागवत, कुलकर्णी, राजे आणि वझे डॉक्टर आणि अश्या अनेक लोकांना आणि ठिकाणांना कधीच विसरू शकणार नाही! ह्या आठवणी आमच्या जडण घडणीचा भाग आहेत. एक एक बुरुज पडतोय आता. आज बोरकर पण गेला. तरीही गिरगावातून गिरगावकर गेला तरी त्याच्या मनातून गिरगाव कधीच जाणार नाही! कारण आम्ही जिवंत आहोत तो पर्यंत ह्या सर्व व्यक्ती आणि ठिकाणांच्या सह आमच्या मनात ते सुवर्ण गिरगाव अखंड जिवंत राहणार आहे! बोरकरला सद्गती प्राप्त होवो!