मुंबई – राज्य विधिमंडळाच्या मुंबई येथे पार पडणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचे उभय सभागृहांचे कामकाज ठरविण्यासाठी शुक्रवारी विधानभवनात पार पडलेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच बहिष्कार घातल्याने उपस्थित सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भूवया उंचावल्या.
आज विधानभवनात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ठरविण्यासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली.
या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर,विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील,विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे) यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे आदी सर्वच जणांनी उपस्थिती लावली.
मात्र खरी प्रतीक्षा होती ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांची.सर्वांच्या नजरा अजितदादांच्या आगमनाकडे होते. त्यांच्यासाठी दुपारी साडेतीन वाजताची वेळही अर्धा तासाने वाढवली गेली.पण दुपारी चार वाजेपर्यंत ना अजित पवार आले ना त्यांच्या तब्बल दहा मंत्र्यांपैकी कोणीही विधानभवनात फिरकला देखील नाही. अखेर नाइलाज म्हणून समितीचे कामकाज पार पडले.
अजितदादा नाराज असल्याची कुजबुज….
समिती सभागृहात कामकाजाला सुरुवात झाली आणि बाहेर उभ्या असलेल्या सर्वपक्षीय नेते, आमदार नवनियुक्त खासदार यांच्या अजित पवारांच्या अनुपस्थितीवरून चर्चांचा फड जमला.शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त खासदार धैर्यशील मोहिते पाटील, उदयनराजे भोसले, संदीपान भुमरे, व अन्य नेते अजित पवारांच्या अनुपस्थितीवरून विविध तर्कवितर्क लावताना दिसून आले. अशातच विधानसभेच्या कामकाजाची बैठक आटोपली. भाजपाचे फायर ब्रँड नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक मानले जाणारे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन बाहेर पडले. बाहेर आल्याआल्या विधिमंडळात वृत्तांकानासाठी उपस्थित असलेल्या काही मोजक्याच पत्रकारांनी त्यांना अक्षरशः गराडा घालून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुपस्थितीवरून विचारणा केली असता गप्पात रंगलेल्या व भान हरपलेल्या महाजन यांनी ” अहो त्यांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील हे उपस्थित होते ना,” असे सांगितल्याने पत्रकारांमध्ये ही एकच हास्याची लकेर उमटली. मात्र दोन्ही सभागृहांचे कामकाज संपून सुद्धा नेमके अजित पवार हे का बरे उपस्थित राहिले नसावेत हे गूढ अखेर गूढच राहीले.